Hippo Attack Lion: जंगलात सर्व्हाइव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजेच सर्वात तंदरुस्त असलेला जंगलात तग धरु शकतो. जो सर्वात शक्तीशाली असतो तोच जंगलात टिकू शकतो. तुम्ही सोशल मीडियावर या वाक्याला दुजोरा देणारे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. यापैकी अनेक व्हिडीओमध्ये सिंह, बिबट्या किंवा वाघ एखाद्या प्राण्याचा पाठलाग करुन शिकार करताना दिसतात. अनेकदा हे प्राणी वेगाच्या जोरावर आपल्या लक्ष्याला पळवून पळवून दमवतात आणि नंतर त्यांची शिकार करतात. मात्र तुम्ही फारच कमी वेळा शिकाऱ्याची शिकार झाली असा व्हिडीओ पाहिला असेल. म्हणजे सिंह दुसऱ्या प्राण्यांना घाबरुन पळाला असा प्रसंग फारच क्वचित घडतो आणि घडला तरी तो फारच कमी वेळा कॅमेरात कैद होतो. असाच एक प्रसंग कॅमेरात कैद झाला आहे. सिंहांच्या एका कळपाचा गेंड्याने पाठलाग केल्याचा थरार काही पर्यटकांनी कॅमेरात टीपला.
नदी ओलांडणाऱ्या 4 सिंहांना पाहून पाणगेंडा त्यांचा पाठलाग करु लागला. हा गेंडा प्रचंड वेगाने सिंहांच्या दिशेने येताना व्हिडीओत दिसत आहे. ट्विटरवर वॉव टेरिफाइंग @WowTerrifying या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 4 सिंह शांतपणे नदीमधून एका बाजूने दुसरीकडे जात असतानाच एक गेंडा त्यांचा पाठलाग करु लागला. आता हा गेंडाच सिंहांची शिकार करणार असं वाटू लागतं. गेंड्याला आपल्या दिशेने येताना पाहून सिंह सुद्धा वेगाने नदीपात्रामधून बाहेर पडण्यासाठी वेग वाढवतात. सिंह वेगाने पुढे जात असतानाही गेंडा या 4 सिंहांना गाठतो. 3 सिंह चपळाईने गेंड्याच्या तावडीतून सुटतात. मात्र 1 सिंह या गेंड्याच्या तावडीत सापडतो.
गेंड्याच्या तावडीत सापडलेल्या सिंहांची धडपड पाहून आता या सिंहांचं काही खरं नाही असं वाटू लागतं. गेंडा या सिंहांच्या पाठीचा चावा घेत आहे असं वाटत असताना सिंह जोरदार धडपड करत स्वत:ला गेंड्याच्या तावडीतून सोडवतो. सिंह स्वत:ला गेंड्याच्या तावडीतून सोडवल्यानंतर तातडीने पाण्याबाहेर पडतो. मात्र हा गेंडा किनाऱ्यावरही या सिंहाचा पाठलाग करतो. पण जमीनीवर सिंह अधिक वेगाने पळून दूर जातो आणि गेंडा पाठलाग थांबवतो. "भयंकर वेग! तुम्ही पाहू शकता की गेंडेही भयानक ठरु शकतात," अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
Terrifying speed! You can see why Hippo's are so dangerous! pic.twitter.com/kTuuDi1UJK
— Wow Terrifying (@WowTerrifying) February 28, 2023
36 लाखांहून अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ केवळ 18 सेकंदांचा आहे. या व्हिडीओच्या व्ह्यूज आणि लाईक्सची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. अनेकांनी गेंड्याचा वेग पाहून आश्चर्य वाटल्याचं खालील प्रतिक्रियांमध्ये म्हटलं आहे. एकाने मजेदार कमेंट करत सिंहांना पाण्यात आपण जंगलाचे राजे असल्याचं दाखवून दिलं, असं म्हटलं आहे. गेंडा त्याच्या जिवाला धोका आहे असं वाटत नाही तोपर्यंत हल्ला करत नाही. मात्र तसं वाटलं तर तो शिकार करणाऱ्या प्राण्यांवरही तुटून पडतो असं अन्य एकाने म्हटलं आहे.
हा व्हिडीओ मूळचा मागील वर्षी अपलोड करण्यात आलेला आहे. बोस्तवाना देशामधील एका जंगल सफारीदरम्यान हा प्रकार घडल्याचं युट्यूबवरील व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे.
या युट्यूबवरील मूळ व्हिडीओलाही हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज आहे.