पाकिस्तानात १६ वर्षीय हिंदू मुलीचं अपहरण, आठवड्यातील तिसरी घटना

'सिंध सरकार सिंध अल्पसंख्यांक संरक्षण आयोग बनवण्याच्या तयारीत आहे आणि या मसुद्याला मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी मंजुरी दिलीय'

Updated: Mar 27, 2019, 09:13 AM IST
पाकिस्तानात १६ वर्षीय हिंदू मुलीचं अपहरण, आठवड्यातील तिसरी घटना title=

नवी दिल्ली / कराची : पाकिस्तानातील सिंध प्रांतात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचं कथितरित्या अपहरण करून त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच गहजब उडाला. या प्रकरणाचा वाद पेटला असतानाच आणखी एका हिंदू मुलीच्या अपहरणाचं प्रकरण समोर येतंय. सिंध सूचना विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर दिसणाऱ्या एका बातमीची दखल अल्पसंख्यांक प्रकरण मंत्री हरिराम किशोरी लाल यांनी घेतलीय. मेघवार समाजाशी निगडीत ही अल्पवयीन मुलगी बादिन जिल्ह्यातील तांदो बाघो या ठिकाणची रहिवासी आहे. 

पीडितेच्या वडिलांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बादिनच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षक (एसएसपी) सरदार हसन नियाजी यांच्याशी संपर्क साधलाय. या मुलीचं अपहरण नेमकं कधी झालं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. किशोरी लाल यांनी अधिकाऱ्यांना अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तसंच मुलीच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत.

सिंध प्रांतात बाल विवाह अवैध - पोलीस

किशोरीलाल यांच्या म्हणण्यानुसार, सिंध प्रांतात बाल विवाह निषेध कायद्यांतर्गत १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलींचा विवाह अवैध आहे. सरकार अल्पवयीन हिंदू मुलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक संभव प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सिंध सरकार सिंध अल्पसंख्यांक संरक्षण आयोग बनवण्याच्या तयारीत आहे आणि या मसुद्याला मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी मंजुरी दिलीय, असंही त्यांनी म्हटलंय.