मुंबई : पावसाने आता कायमची विश्रांती घेऊन ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली असे वाटत असताना पावसाने पुन्हा आपली आठवण साऱ्यांना करुन दिली आहे. परतीच्या पावसाने राज्यभरात ठिकठिकाणी दमदार एन्ट्री केली आहे. मुंबईत रात्रभर पावसाने हजेरी लावली. काल संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. पाऊस गेला असे समजून बाहेर पडलेल्या मुंबईकरांची धावपळ झाली. या पावसाचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात पावसाने झाली असली तरी आता आकाश निरभ्र झाले आहे.
लातूर जिल्ह्यात अद्यापही म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे पाणीटंचाईचे सावट शहरावर आहे. त्यातच काल मध्यरात्रीपासून लातूर शहर आणि जिल्ह्यातील निलंगा शहरासह अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसला. लातूर जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार होऊन पिण्याच्या पाण्याचे संकट नेहमीच दूर होत असतं. असाच काहीसा पाऊस रात्री उशिरापर्यंत शहर आणि जिल्ह्यातील भागात बरसत होता.
लातूर जिल्ह्याची पावसाची सरासरी ही ८०२ मिमी इतकी असून आतापर्यंत ५०० मिमीच्या वर पाऊस सरकलेला नाही. त्यात सर्वाधिक कमी पाऊस हा लातूर तालुक्यात ३०० मिमी पेक्षा कमी झाला आहे.
बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा धरण क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे येत्या १ नोव्हेंबरपासून लातूर शहराला टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासह बीड-उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा धरण क्षेत्रात परतीच्या पावसाने दमदार एंट्री मारून लातूरचे पाणीसंकट दूर करावे अशी अपेक्षा लातूरकर नागरिक व्यक्त करीत आहेत.