घराच्या गेटवर खेळताना मुलाच्या गळ्यातून लोखंडी सळई आरपार

चार दिवसांच्या उपचारांनंतर अखेर चिमुकल्याची प्रकृती स्थिर

Updated: Jul 3, 2019, 07:35 PM IST
घराच्या गेटवर खेळताना मुलाच्या गळ्यातून लोखंडी सळई आरपार title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, ठाणे: उल्हासनगरमध्ये अंगावर काटा आणणाऱ्या एका दुर्घटनेत आठ वर्षांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा मुलगा घराच्या गेटवर खेळत होता. त्यावेळी पाय घसरून तो खाली पडला. यावेळी गेटच्या वरच्या भागात लावण्यात आलेली लोखंडी या मुलाच्या गळ्यातून आरपार गेली. 

येथील म्हारळ गावात हा प्रकार घडला. जखमी झालेल्या मुलाचे नाव सार्थक करचुरे असे आहे. २८ जूनला सार्थक घराबाहेरील गेटवर चढून खेळत होता. त्यावेळी पाय घसरल्यामुळे तो थेट खाली आला आणि गेटवर सुरक्षेसाठी लावण्यात आलेला अणकुचीदार बाण त्याच्या गळ्यात शिरला. हा बाण थेट त्याच्या तोंडातून बाहेर निघाला. यानंतर सार्थक बराच वेळ गेटवर निपचित पडून होता. थोड्यावेळाने हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आला. यानंतर त्यांनी सार्थकला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मोठ्या जिकिरीने लोखंडी सळई त्याच्या तोंडातून बाहेर काढली. मात्र, यानंतरही सार्थकची प्रकृती गंभीर होती. अखेर अनेक दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी त्याची प्रकृती स्थिर झाली. 

आता सार्थक तोंडावाटे अन्नही खाऊ लागला आहे. या घटनेमुळे त्याला सुरुवातीला मोठा मानसिक धक्का बसला होता. मात्र, आता तो यामधून बाहेर पडला असून त्याची प्रकृती पूर्णपणे स्थिरावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याला अक्षरशः जीवदान मिळाल्याची भावना त्याच्या आजोबांनी व्यक्त केली.