ना रजिस्ट्रेशन हवं ना ड्रायव्हिंग लायसन्स! सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; फक्त 999 रुपयांत बुकिंग सुरु

Yulu Wynn Electric Scooter: Yulu Wynn ची इलेक्ट्रिक स्कूटर ही सेंट्रल मोटर व्हेईकल रुल्स (CMVR) अंतर्गत लो स्पीड व्हेईकल कॅटेगरी अंतर्गत येते. यामुळे ही स्कूटर चालवण्यासाठी ना रजिस्ट्रेशनची गरज असते, ना ड्रायव्हिंग लायसन्सची गरज आहे.   

शिवराज यादव | Updated: May 1, 2023, 05:41 PM IST
ना रजिस्ट्रेशन हवं ना ड्रायव्हिंग लायसन्स! सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; फक्त 999 रुपयांत बुकिंग सुरु title=

Yulu Wynn Electric Scooter: भारतामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याने कंपन्यादेखील रोज नवनव्या गाड्या बाजारात आणत आहेत. आपली कार, बाईक जास्तीत जास्त आकर्षक असावी, त्यात अत्याधुनिक फिचर असावेत यासह ती ग्राहाकांना परवडणारी असावी याकडे कंपन्या लक्ष देत आहेत. यादरम्यान Yulu ने आता बाजारात आपली Yulu Wynn स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 55 हजार 555 इतकी ठेवण्यात आली आहे. 

या स्कूटरसाठी अधिकृत बुकिंग सुरु कऱण्यात आली आहे. ही स्कूटर तुम्ही फक्त 999 रुपयांत बूक करु शकता. या महिन्यात कंपनी स्कूटरची डिलिव्हरी सुरु करण्याची शक्यता आहे. बुकिंगसाठी दिलेले पैसे रिफंड मिळणार आहेत. कंपनीने सध्या ही स्कूटर प्राथमिकपणे कमी किंमतीत लाँच केली असली, तरी भविष्यात किंमत वाढण्याची शक्यता आहे. कंपनीकडून लाँच करण्यात आलेलं हे पहिलं इलेक्ट्रिक वाहन आहे. 

Yulu Wynn ला कंपनीने कॉम्पॅक्ट डिझाईन दिलं आहे. कंपनीने ही स्कूटर तयार करताना तरुणांकडे प्रामुख्याने लक्ष दिलं आहे. Yulu Wynn ची इलेक्ट्रिक स्कूटर ही सेंट्रल मोटर व्हेईकल रुल्स (CMVR) अंतर्गत लो स्पीड व्हेईकल कॅटेगरी अंतर्गत येते. यामुळे ही स्कूटर चालवण्यासाठी ना रजिस्ट्रेशनची गरज असते, ना ड्रायव्हिंग लायसन्सची गरज आहे. पण आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही हेल्मेट नेहमी घालावं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

या स्कूटरमध्ये कंपनीने 15 व्होल्ट 19.3Ah च्या क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. एका चार्जिंगमध्ये ही स्कूटर 68 किमी धावणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. पण शहरात ही रेंज 61 किमीपर्यंत असेल. यामध्ये BLDC इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. तसंच या स्कूटरचा टॉप स्पीड 24.9 ताशी किमी आहे. याशिवाय यामध्ये स्पैलेबल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी बदलण्यासाठी फक्त 1 मिनिट लागतो असा कंपनीचा दावा आहे. 

या स्कूटरच्या फ्रंटला टेलेस्कोपिक फॉर्क सस्पेंशन आणि मागील बाजूला स्प्रिंग कोल सस्पेंशन देण्यात आलं आहे. दोन्ही चाकांमध्ये 110 एमएमचा ड्रम ब्रेक आहे. या स्कूटरचं वजन 100 किलो आहे. ही स्कूटर मूनलाइट व्हाइट आणि स्कारलेट रेड अशा दोन रंगात उपलब्ध असणार आहे.