शारजाह : आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने केकेआरवर 82 धावांनी मिळवलेल्या विजयाचं श्रेय एबी डिव्हिलियर्सच्या 33 बॉलमध्ये केलेल्या 72 रनच्या नाबाद खेळीला दिलं आहे. या सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या डिव्हिलियर्सने 5 चौकार आणि 6 सिक्स लगावले होते. सामन्यानंतर कोहली म्हणाला की, 'एका बलाढ्य संघाविरूद्धचा हा मोठा विजय आहे. आता हा आठवडा आमच्यासाठी खूप व्यस्त असेल, तो चांगल्या प्रकारे सुरू करणे महत्वाचे होते. ख्रिस मॉरिसच्या आगमनाने आता गोलंदाजी आणखी आक्रमक झाली आहे.'
तो म्हणाला की, 'आम्ही या स्कोअरमुळे खूष होतो. खेळपट्टी कोरडी होती आणि दिवस चांगला होता म्हणून आम्हाला वाटले की तिथे दव पडणार नाही. पण 'सुपर ह्युमन' (डिव्हिलियर्स) वगळता प्रत्येक फलंदाजाला खेळपट्टीवर त्रास झाला. डिव्हिलियर्सची इनिंग अविश्वसनीय होती.'
कोहलीने पुढे म्हटलं की, 'तो आला आणि त्याने तिसऱ्या बॉलपासून खेळायला सुरवात केली. मला हे आवडले. मी म्हणालो की इतर सामन्यांत बरेच लोक चांगले डाव खेळत असल्याचे आपल्याला दिसले तरी एबी काय आहे आणि तो काय करू शकतो. हे दिसलं. तो एक शानदार डाव होता. आम्ही अशी चांगली भागीदारी करू शकलो याचा मला आनंद आहे (नाबाद १००) आणि मी त्याचा डाव पाहण्यासाठी सगळ्यात चांगला जागी होतो.'
डिव्हिलियर्स म्हणाला की, माझ्या कामगिरीमुळे खूप आनंद झाला. मी एवढेच सांगू शकतो. शेवटच्या सामन्यात मी शून्यावर बाद झालो, ही खूप वाईट भावना होती. मी योगदान देऊन आनंदित आहे. खरं सांगायचं झालं तर मला स्वतःहून आश्चर्य वाटले. आम्ही 140-150 च्या दिशेने जात होतो आणि मला वाटले की, मी 160-165 पर्यंत प्रयत्न करू शकेन पण 195 धावांपर्यंत पोहोचणे आश्चर्यकारक आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकनेही डिव्हिलियर्सचे कौतुक करताना म्हटले आहे की, 'एबी एक उत्तम खेळाडू आहे. त्याला थांबविणे अवघड आहे. त्याने दोन संघांमधील फरक निर्माण केला. आम्ही सर्व काही करून पाहिले. केवळ इनस्विंग आणि यॉर्कर रोखू शकत होती. अन्यथा सर्व चेंडू बाहेर जात होते. आम्हाला काही गोष्टी चांगल्या प्रकारे करण्याची आवश्यकता आहे. आम्ही जरी 175 धावांवर रोखले असते, परंतु तरी आम्हाला फलंदाजीत सुधारणा करावी लागेल.'