कोलकाता : विद्यमान BCCI अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे सौरभ गांगुली काल बुधवारपासून होम क्वारंटाइन झाला आहे, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. स्नेहाशीष गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेच्या सहाय्यक सचिवपदी कार्यरत आहे.
स्नेहाशिष यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली. स्नेहाशिष हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी काही काळ बंगालच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक नियमांनुसार सौरव गांगुलीलाही घरात क्वारंटाइन व्हावे लागणार आहे, अशी माहिती बंगाल क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली. स्नेहाशिष मोमीनपुर येथे वास्तव्यास होते. पण त्यांची पत्नी आणि सासरची मंडळी यांना करोनाची लागण झाल्याने ते सौरव गांगुली रहात असलेल्या बेहाला येथील घरात स्थलांतरित झाले होते. पण त्यांना सातत्याने ताप येत असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.