'ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल जिंकायला नको होतं' मनू भाकेर असं वडिलांना का म्हणाली?

Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy: एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणाऱ्या देशाची पहिली खेळाडू मनू भाकर खेळातील सर्वोच्च पुरस्कार न मिळाल्याने नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

Pravin Dabholkar | Updated: Dec 24, 2024, 01:47 PM IST
'ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल जिंकायला नको होतं' मनू भाकेर असं वडिलांना का म्हणाली? title=
मनू भाकेर खेलरत्न

Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy: 2024 पॅरीस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदक जिंकून भारताची टॉप तिरंदाज मनू भाकेरने इतिहास रचला. खेल रत्न पुरस्कार न मिळाल्याने मनू भाकेर आणि तिच्या चाहते, हितचिंतकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मी पुरस्कारासाठी ऑनलाइन पोर्टलवर आपले नाव पाठवले होते पण 30 नावे शॉर्टलिस्ट झाली. त्यात जागा मिळवू शकले नाही, अशी प्रतिक्रिया मनू भाकेरने दिली. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणाऱ्या देशाची पहिली खेळाडू मनू भाकर खेळातील सर्वोच्च पुरस्कार न मिळाल्याने नाराज असल्याचे म्हटले जात आहे. तिच्या वडिलांनी यासंदर्भात आपल्या वेदना शब्दात मांडल्या आहेत. 

खेलरत्न पुरस्कारासाठी अंतिम निवड करणाऱ्या समितीवर मनू भाकेरच्या वडिलांनी टीका केली आहे. मनू भाकेरने पुरस्कारासाठी आपलं नाव पाठवलं नव्हतं, असं क्रिडा विभागाचं म्हणणं होतं. पण मनूच्या वडिलांनी याचे खंडन केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाला त्यांनी प्रतिक्रिया दिली. 

तिला शूटींगमध्ये पाठवल्याचा मला पश्चाताप होतोय. मला तिला क्रिकेटर बनवायला हवं होतं. मग सर्वांनी तिचे कौतूक केले असते. तिने एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल जिंकले. असे आधी कोणीच केले नव्हते. माझ्या मुलीने देशासाठी आणखी काय करायला हवं, अशी तुमची अपेक्षा आहे? असा प्रश्न मनू भाकेरच्या वडिलांनी विचारला. सरकारने तिचे प्रयत्न ओळखायला हवेत. मी मनूशी बोललो. ती निराश होती. 'मला ऑलिम्पिकमध्ये जायला नको होतं आणि देशासाठी पदक जिंकायला नको होतं', खरंतर मला खेळाडूच बनायला नको होतं,' असं मनूने आपल्याला सांगितल्याचा दावा तिच्या वडिलांनी केलाय. क्रिडा मंत्रालय आणि महासंघ याप्रकरणी सखोल चौकशी करत आहेत. 

अर्जाबद्दल काय म्हणाली मनू? 

मी पोर्टलवर अर्ज केला होता. समितीने माझ्या नावाचा विचार केला असेल असे मला वाटल्याचे मनू सांगते. आता महासंघाने मंत्रालयाशी संपर्क केलाय आणि मनूचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी घेण्याचे आवाहन केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनूने देशातील तिसरे आणि चौथे मोठे नागरी सन्मान पद्म भूषण आणि पद्मश्रीसाठीदेखील अर्ज केला आहे. पद्म पुरस्कारांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज पोर्टलवर भरण्यात आले होते. 

अंतिम यादीत मनूचे नाव असण्याची शक्यता 

अद्याप अंतिम यादी तयार झालेली नाही. एक-दोन दिवसात यावर निर्णय होईल. अंतिम यादीत मनूचे नाव असण्याची शक्यता क्रिडा मंत्री मनसूख मांडवीय यांनी वर्तवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश वी रामासुब्रमम यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय पुरस्कार समितीमध्ये भारतीय महिला हॉकी टीमची माजी कप्तान रानी रामपालदेखील आहे. क्रिडा मंत्रालयाच्या नियमानुसार, खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूने आपला अर्ज स्वत: पाठवायचा असतो. ज्यांनी अर्ज केले नाहीत अशा नावांचादेखील समिती विचार करु शकते. मनूने अर्ज न केल्याचा दावा क्रिडा मंत्रालयाकडून करण्यात आलाय.