मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या विश्वातील ज्या गोष्टीवर चर्चा सुरू होती अखेर ती खरी ठरलीये. भारताचा कर्णधार विराट कोहलीने टी-20चं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल बऱ्याच दिवसांपासून प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर गुरुवारी त्याने ट्विटरवरून याची घोषणा केली. मात्र आता प्रश्न असा या मागचं नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय? कोहलीला अचानक कर्णधारपद का सोडावं लागलं?
अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे, कोहलीचं वर्तन हे यामागील एक मोठं कारण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, "विराटची समस्या संवाद आहे. महेंद्रसिंग धोनीची खोली चोवीस तास उघडी होती आणि कोणताही खेळाडू आत येऊ शकत होता. त्याच्यासोबत व्हिडिओ गेम खेळू शकतो, जेवू शकतो आणि गरज पडल्यास क्रिकेटबद्दल बोलू शकतो. मात्र मैदानाबाहेर कोहलीशी संपर्क साधणे खूप कठीण आहे."
तर दुसरीकडे असंही म्हटलं जातंय की, कोहलीने निवड समितीला प्रस्ताव दिला होता की रोहितला उपकर्णधारपदावरून हटवावं. कोहली म्हणाला की, रोहित 34 वर्षांचा असल्याने ही जबाबदारी एका तरुणावर सोपवली पाहिजे. कोहलीला खरं तर ऋषभ पंत किंवा लोकेश राहुल यांना उपकर्णधार बनवायचं होतं, अशीही चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, “बोर्डाला कोहलीचा हा दृष्टिकोन आवडला नाही." दरम्यान कोहलीने टी -20 कर्णधारपद सोडल्यास रोहीत शर्माला ही जबाबदारी मिळणं जवळपास निश्चित आहे आणि अशा परिस्थितीत पंत, राहुल आणि जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाचे दावेदार असू शकतात.