IPL 2024 Mumbai Indians Team Unrest: मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रिमिअर लीग 2024 शुरु होण्याआधी अलिबागमध्ये गेट टू गेदर तसेच टीम बॉण्डींगसंदर्भातील प्लॅनिंगनुसार पोहोचला आहे. मात्र या ट्रीपकडे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील वरिष्ठ खेळाडू व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाठ फिरवल्याचं दिसत आहे. दोघेही या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत अलिबागमध्ये संघाबरोबर नव्हते अशी माहिती समोर आली आहे.
कर्णधार हार्दिक पंड्या, इशान किशन, टीम डेव्हीड, रोमारिओ शेफर्ड, मोहम्मद नबी, अर्जून तेंडुलकर आणि इतर खेळाडू टीम बॉण्डींगसाठी तसेच रिलॅक्स होण्यासाठी अलिबागला पोहोचले आहेत. या संघाबरोबर सपोर्टिंग स्टाफपैकी मार्क बाऊचर, लसिथ मलिंगा, केरन पोलार्डसुद्धा आहेत. या खेळाडूंचे अलिबागमधील जेट्टीवर दाखल होतानेच व्हिडीओ समोर आले होते. अलिबागला पोहोचल्यानंतर काही काळ आराम केल्यावर संघातील खेळाडूंनी एकमेकांबरोबरचं बॉण्डींग नीट असावं या उद्देशाने खेळवण्यात आलेल्या पेंटबॉल गेमचा आनंद घेतला, असं 'हिंदुस्तान टाइम्स'ने म्हटलं आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाने यापूर्वी रोहित शर्माने स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच्या सराव शिबिराला हजेरी लावली तेव्हा त्याचं कसं जंगी स्वागत करण्यात आलं, याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र अलिबागमध्ये दाखल झालेल्या संघाबरोबर रोहित दिसून न आल्याने पुन्हा त्याच्या नाराजीच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. बुमराह सुद्धा संघाबरोबर दिसला नाही. मात्र तो सराव शिबिरातही सहभाही झालेला नाही. तरुण फलंदाज तिलक वर्मा आणि डिवॅल्ड ब्रेव्हीस हे दोघे सरावासाठी उपस्थित होते मात्र अलिबागमध्ये संघासोबत दिसले नाहीत. मुंबईचा यंदाच्या पर्वातील पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना रविवारी 24 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच्या या टीम बॉण्डींग सेशनपासून रोहित आणि बुमराह दूर असल्याने वरिष्ठ खेळाडूंना हार्दिकचं नेतृत्व मान्य नाही की काय अशी चर्चा दबक्या आवाजात क्रिकेट विश्वास सुरु आहे.
नक्की पाहा >> Mumbai Indians च्या व्हिडीओमधून हार्दिक विरुद्ध रोहित वाद चव्हाट्यावर? चाहत्यांना वेगळीच शंका
यंदाच्या पर्वाच्या आधीच मुंबई इंडियन्सच्या संघाने गुजरात टायटन्सकडून प्लेअर ट्रेडअंतर्गत हार्दिक पंड्याला पुन्हा मुंबईच्या संघात घेतलं. त्यानंतर अचानक त्याची कर्णधारपदी नियुक्ती केल्याने मोठा वाद निर्माण झाला. मागील अनेक वर्षांपासून संघाचं नेतृत्व करणाऱ्या आणि 5 वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माऐवजी हार्दिकला अचानक कर्णधार घोषित केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियापासून ते क्रिकेट वर्तुळातील दिग्गजांपर्यंत अनेकांनी यावर मतं मांडली. आता अगदी पर्व सुरु होण्याच्या तोंडावरही हार्दिकच्या निवडीवरुन टीका होताना आणि हार्दिक रोहितसारखी कामगिरी करु शकेल का यासंदर्भातील शंका उपस्थित केली जात आहे.