IPL 2023 : क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाणार इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) अर्थात आयपीएल (IPL 2023) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लीगचे सर्व सामने संपले असून टॉप चार संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाले आहेत. यात गुजरात टायटन्स (GT), चेन्नई सुपर किंग्स (CSK), लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (MI) या संघांचा समावेश आहे. यातला प्लेऑफचा पहिला सामना हार्दिक पांड्याच्या गुजरात आणि एमएस धोणीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळला जाईल. तर दुसरा सामना कृणाल पांड्याच्या लखनऊ आणि रोहित शर्माच्या मुंबईदरम्यान रंगेल.
जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग
इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतात. ऑक्शनमध्येही खेळाडूंवर करोडोची बोली लावली जाते. इतकंच काय तर विजेत्या संघाला कोट्यवधी रुपयांचं बक्षीस दिलं जातं. याशिवाय विजेत्या संघाचे खेळाडूही मालामाल होतात.
2008 पासून सुरु झालेल्या आयपीएएल स्पर्धेचा हा सोळावा हंगाम आहे. जसजशी स्पर्धेची वर्ष वाढत गेली, तसतशी या स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेतही भरघोस वाढ होत गोली. आयपीएलच्या धर्तीवर जगभरात अनेक क्रिकेट लीग खेळवल्या जातात. यात बिग बॅश लीग (BBL), पाकिस्तान सुपर लीग (PSL), कॅरेबिअन प्रीमिअर लीग (CPL), द हंड्रेड(The Hundred), बांगलादेश प्रीमिअर लीग अशा अनेक लीग होतात. या स्पर्धांमध्ये आणि आयपीएल स्पर्धेच्या बक्षीस रकमेत जमीन आसमानाचा फरक आहे.
आयपीएल 2023 प्राइज मनी
आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजे 2008 मध्ये बक्षीसाची एकूण रक्कम 12 कोटी रुपये इतकी होती. विजेत्या संघाला 4.8 (Winner) तर उपविजेत्या संघाला (Runners-up) 2.4 कोटी रुपये मिळाले होते. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या संघाला प्रत्येकी 1.2 कोटी रुपये देण्यात आले होते. तर आयपीएल 2008 च्या विजेत्या अर्थात राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 1.2 कोटी बक्षिस देण्यात आलं होतं.
आता आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु असून बक्षीसांची रक्कम दहापट वाढ झाली आहे. यंदा बक्षीसाची एकूण रक्कम 46.5 कोटी रुपये इतकी आहे. विजेत्या संघाला तब्बल 20 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या संघाला अनुक्रमे 7 आणि 6.5 कोटी रुपये मिळतील.
ऑरेंज कॅप- पर्पल कॅप विजेत्यांचं बक्षीस
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप (Orange Cap) पटकावणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप (Purple Cap) पटकावणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी 15 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. याशिवाय इमर्जिंग प्लेअरला (Emerging player of the tournament IPL 2023) 20 लाख रुपये, सुपर स्ट्रायकर ऑफ सीजन (Super striker player of the season 2023) 15 लाख रुपये, पॉवर प्लेअर ऑफ द सीजन (Power player of the season), मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर ऑफ द सीजन (Most valueable player of the season), गेमचेंजर प्लेयर ऑफ द सीजन आणि सर्वात जास्त सिक्स मारणाऱ्या खेळाडूंना (Most sixes of the season) प्रत्येकी 12 लाख रुपये बक्षीसांची रक्कम असणार आहेत.