भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडने प्रशिक्षकपद सोडल्यानंतर गौतम गंभीरच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. गौतम गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान होऊन आता दोन महिने झाले आहेत. श्रीलंकेविरोधातील मालिका आणि बांगलादेशविरोधातील एका कसोटी सामन्यानंतर लगेचच गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांच्या कामगिरीची तुलना केली जाऊ शकत नाही. पण नेमका त्याचा दृष्टीकोन कसा आहे याची कल्पना येत आहे. यादरम्यान फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीची तुलना केली आहे.
बांगलादेशविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू कामगिरी कऱणाऱ्या आऱ अश्विनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आर अश्विनने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात जबरदस्त कामगिरी केली. आर अश्विनने सांगितलं की, राहुल द्रविडच्या तुलनेत गौतम गंभीर ड्रेसिंग रुममध्ये जास्त शांत असतो.
आर अश्विनने यावेळी उदाहरण देत ड्रेसिंग रुममध्ये ड्रेसिंग रुममध्ये दोघात किती फरक आहे याबद्दल सांगितलं. राहुल द्रविड काही गोष्टींबाबत फार आग्रही असून, गौतम गंभीर मात्र नाही असं तो म्हणाला. "मला वाटतं तो (गौतम गंभीर) फार शांत आहे. मी त्याला 'रिलॅक्स रँचो' म्हणेन. त्याच्यावर अजिबात दबाव नसतो. सकाळी संघाचा फार गोंधळ असतो, तो त्याबाबतीतही सहज आहे. तो अत्यंत सहजपणे, 'तुम्ही येताय का? प्लीज या' असं सांगेल. असंच सर्व आहे," असा खुलासा आर अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर केला.
पुढे त्याने सांगितलं की, "पण राहुल भाईसोबत वेगळं आहे. तो ड्रेसिंग रुममध्ये आला की त्याला सगळं सुरळीत लागतं. बाटलीही एका ठराविक वेळी ठराविक जागी हवी. तो फार आग्रही आहे. त्याला गोष्टी सुरळीत लागतात. पण गंभीरला मात्र अशी कोणतीही अपेक्षा नसते. तो फार निवांत असतो. तो लोकांची व्यक्ती आहे. तो प्रत्येकाचं ह्रदय जिंकतो. मला वाटतं तो सर्वांचा आवडता होईल".
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांच्याव्यतिरिक्त फक्त आर अश्विन एकमेव खेळाडू आहे ज्याने गौतम गंभीरसह खेळाडू म्हणून ड्रेसिंग रुम शेअर केली आहे.
भारताच्या टी-20 वर्ल्डकप विजयानंतर राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आणि गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज न करण्याचा निर्णय घेतला आणि बीसीसीआयने जूनमध्ये गंभीरला त्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. गंभीरच्या पहिल्या मालिकेत मिश्र परिणाम दिसून आले, भारताने T20I मालिका जिंकली पण श्रीलंकेविरोधातील एकदिवसीय मालिका गमावली. सध्या सुरु असलेल्या बांगलादेशविरोधातील पहिल्या सामन्यातील विजयामुळे भारताचं मनोबल उंचावलं आहे.