बंगळुरू : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला आहे. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं ही टी-२० सीरिज २-०नं जिंकली आहे. ग्लेन मॅक्सवेलनं केलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं भारतात पहिल्यांदाच टी-२० सीरिजमध्ये विजय मिळवला.
ग्लेन मॅक्सवेलनं ५५ बॉलमध्ये नाबाद ११३ रनची खेळी केली. मॅक्सवेलच्या खेळीमध्ये ९ सिक्स आणि ७ फोरचा समावेश होता. भारतानं ठेवलेल्या १९१ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दोन विकेट २२ रनवर पडल्या. यानंतर डाआर्सी शॉर्ट आणि मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियाला सावरलं. डाआर्सी शॉर्ट २८ बॉलमध्ये ४० रन करून आऊट झाला. यानंतर मॅक्सवेलनं पीटर हॅण्ड्सकॉम्बच्या मदतीनं ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला. हॅण्ड्सकॉम्ब १८ बॉलमध्ये २० रन करून नाबाद राहिला. भारताकडून विजय शंकरला सर्वाधिक २ विकेट तर सिद्धार्थ कौलला १ विकेट मिळाली.
त्याआधी या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगची संधी दिली. भारतानं २० ओव्हरमध्ये १९०/४ एवढा स्कोअर केला. शेवटच्या ६ ओव्हरमध्ये भारतानं तब्बल ९१ रन केले. कर्णधार विराट कोहलीनं ३८ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता. धोनीनंही कोहलीला चांगली साथ दिली. धोनीनं २३ बॉलमध्ये ४० रन केले.
या मॅचमध्ये भारतानं रोहित शर्माऐवजी शिखर धवनला संधी दिली होती. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. केएल राहुल आणि शिखर धवन ओपनिंगला आले होते. पण धवन २४ बॉलमध्ये फक्त १४ रन करून माघारी परतला. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक करणाऱ्या केएल राहुलनं या मॅचमध्ये २६ बॉलमध्ये ४७ रन केले. ऋषभ पंतही १ रन करून आऊट झाला. शेवटच्या ओव्हरला बॅटिंगला आलेला दिनेश कार्तिक ३ बॉलमध्ये ८ रन करून नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून बेहरेनड्रॉफ, नॅथन कुल्टर नाईल, पॅट कमिन्स आणि डीआर्सी शॉर्ट यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.