हार्दिकला ज्ञान पाजळण्याची गरज नव्हती! तिलक वर्माचं कौतुक करत रोहित शर्माचा टोला

Rohit Sharma On Tilak Varma Hardik Pandya Issue: वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्याने तिलक वर्माला अर्धशतक साजरं करण्यासाठी एका धावेची गरज असताना षटकार मारुन विजय मिळवून दिल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच रोहितने या सामन्यासंदर्भात भाष्य केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 11, 2023, 09:03 AM IST
हार्दिकला ज्ञान पाजळण्याची गरज नव्हती! तिलक वर्माचं कौतुक करत रोहित शर्माचा टोला title=
रोहित शर्माने तिलक वर्माच्या खेळासंदर्भात केलं विधान

Rohit Sharma On Tilak Varma Hardik Pandya Issue: भारतीय टी-20 संघामध्ये पदार्पण केलेल्या मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा दमदार कामगिरी करत आहे. भारत वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये 2 सामने पराभूत झालाय आणि 1 सामना जिंकला आहे. मात्र या तिन्ही सामन्यांमध्ये तिलक वर्माने तुफान फटकेबाजी केली. या मालिकेमध्ये तिलक वर्मा हा सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज आहे. तिलक 49 धावांवर असताना आणि 2 षटकं असताना जिंकण्यास 2 धावा आवश्यक होत्या तेव्हा हार्दिक पंड्याने षटकार लगावत भारताला सामना जिंकून दिला. मात्र यामुळे तिलक वर्माला अर्धशतक झळकावता न आल्याने भारतीय क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. तिलकची फलंदाजी आणि सामन्याचा शेवट पाहून अनेक चाहत्यांनी तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही या प्रकरणावर भाष्य करताना तिलक वर्माला हार्दिक पंड्याच्या सल्ल्याची काही गरज नव्हती असं विधान करत टी-20 कर्णधारावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

नेमकं घडलं काय?

झालं असं की, तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळेस तिलक वर्मा हा 46 धावांवर खेळत होता. तिलक वर्मा अर्धशतक पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचं दिसत होतं. मात्र दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पंड्याने त्याला शेवटपर्यंत नाबाद राहा आणि सामना संपवूनच जाऊ असा सल्ला दिल्याचं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं. नाबाद राहण्याचा फरक पडतो असं पंड्या तिलकला सांगत असल्याचं या रेकॉर्डींगमध्ये ऐकू येत आहे. त्यानंतर तिलक वर्माने 1-1 धाव करत 49 पर्यंत आला. भारतीय संघाला विजयासाठी केवळ 2 धावा हव्या होत्या. हार्दिक पंड्या फलंदाजी करत होता. मात्र पंड्याने एक धाव काढून अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तिलक वर्माला स्ट्राइक देण्याऐवजी षटकार लगावत सामना जिंकून दिला. पंड्याच्या या कृतीमुळे आपल्या पदार्पणाच्या सिरीजमध्ये तिलक वर्माला सलग दुसरं अर्थशतक करण्याच्या संधीने हुलकावणी दिली. वर्मा 49 धावांवर नाबाद राहिला. हार्दिकने स्पोर्ट्समनशीप दाखवली नाही अशी टीका अनेकांनी केली. हार्दिकला स्वार्थी कर्णधार असाही टॅग अनेकांनी दिला. अनेकांना तर धोनीची आठवण झाली. 

पंड्यावर टीका

चाहत्यांनी कर्णधारालाच लक्ष्य केल्याचं सामना संपल्यानंतर दिसून आलं हार्दिक पंड्याने आपलं ज्ञान पाजळून तिलक वर्माच्या डोक्यात नाबाद राहण्यासंदर्भात काही घालतं नसतं, नको तो सल्ला दिला नसता तर त्याचं अर्धशतक तो त्या धडाकेबाज पद्धतीने खेळत होता त्याच शैलीत पूर्ण केलं असतं. पंड्याच्या सल्ल्याने तिलक वर्मा कॉन्शिअस झाला असंही अनेकांनी म्हटलं आहे. याचसंदर्भात बोलताना रोहित शर्माने तिलक वर्माला कधी फटके मारायचे आणि कधी नाही याचं ज्ञान असल्याचं म्हटलं आहे.

रोहित काय म्हणाला?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून तिलक वर्मा अनेक सामने खेळला आहे. तिलक वर्माबद्दलचा आपला अनुभव सांगताना रोहितने, "तिलक फार कौशल्य असलेला खेळाडू आहे. त्याला धावांची भूक असल्याचं दिसून येतं. हे फार महत्त्वाचं आहे. तो फार परिपक्व आहे. जेव्हा मी त्याच्याशी बोलतो तेव्हा त्याला कधी फटकेबाजी करायची आणि कधी नही याचं ज्ञान आहे," असं म्हटलं आहे.