Turkey Yusuf Dikec: ऑलिम्पक 2024 मध्ये आपण आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू पाहिले असतील. पण यामध्ये तुर्कीचा नेमबाज युसूफ डिकेक या खेळाडुची सर्वात जास्त चर्चा झाली. आपल्या विशिष्ट 'गियरलेस' खेळीमुळे तो सोशल मीडियात सर्वाधिक लोकप्रिय ठरला. आपल्या आरामदायी शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या डिकेकने पारंपारिक सुरक्षात्मक इयरप्लग आणि विशेष लेंसचा वापर जाणिवपूर्वक टाळला. त्याऐवजी त्याने नेहमीचा चष्मा आणि टीम टी-शर्टचा पर्याय निवडला. इतर खेळांडुपेक्षा वेगळा हावभाव, दुसरा हात नकळतपणे खिशात ठेवला होता. डावा हात खिशात टाकून उजव्या हाताने गोळ्या झाडत सहजपणे 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम स्पर्धेत रौप्यपदक जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे तो जगभरात चर्चेत राहिला. त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात सर्वांना उत्सुकता आहे. घटस्फोट झाल्यानंतर तो नेमबाजीत यश मिळवू लागला, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबद्दलची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यातून निघालेला निष्कर्ष जाणून घेऊया.
तुर्कीचा नेमबाज युसूफ डिकेक त्याची एक्स पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर कथितपणे हा खेळ स्वीकारल्याचे म्हटले गेले. एक्स म्हणजेच आधीचे ट्वीटर आणि फेसबुकसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा दावा करण्यात आला. घटस्फोट झाल्यावर बायकोवरील राग काढण्यासाठी त्याने नेमबाजी स्वीकारली आणि या रागामुळेच नेमबाजीत त्याला यश मिळत गेल्याचे यूजर्स म्हणत आहेत. एखादा खेळाडू प्रसिद्धीझोतात आला की त्याच्याबद्दल विविध बाजुंनी चर्चा सुरु होतात. त्याच्या खासगी आयुष्यातील घडामोडीदेखील जगासमोर येऊ लागतात. युसूफ डिकेकही त्याला अपवाद नव्हता.
युसूफ डिकेकची शैली आणि त्याच्या यशामागे अनेक रहस्य असल्याचे म्हटले जाते. युसूफ एक मॅकेनिक होता आणि घटस्फोटानंतर त्याने शूटींग सुरु केली, असा दावा एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आला. पण याची सत्यता पडताळल्यास घटस्फोट आणि नेमबाजी यांचा काही संबंध नसल्याचे समोर आले आहे. डिकेक यांच्या शिक्षण, करिअची माहिती समोर आली आहे. त्यानुसार डिकेक हे तुर्की जेंडरमेरीचे सेवानिवृत्त वरिष्ठ मास्टर सर्जंट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपले शिक्षण सैनिक शाळेतून केल्याची माहिती देण्यात आली. डिकेक यांनी 2007 मध्ये हैदराबाद सैन्य विश्व खेळात सहभागी होण्यासाठी भारताचा दौरादेखील केला होता. या स्पर्धेत त्याला रौप्य पदक मिळाले होते. युसूफ डिकेकने गाझी यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग अॅण्ड एज्युकेशन (अंकारा, टूरिज्मो) तून शिक्षण पूर्ण केले. यानंतर सेल्कुक यूनिव्हर्सिटी (कोन्या, टुरिज्मो)हून कोचिंगमध्ये मास्टर डिग्री मिळवली.
डिकेकने सर्वप्रथम 2001 मध्ये नेमबाजी स्पर्धेत सहभाग घेतला होता. पुढे युसूफ डिकेकने 2008, 2012, 2016, 2020 अशा 4 वेळा मेडल जिंकलय. 2014 मध्ये 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्टल आणि 25 मीटरध्ये 10 मीटर एअर पिस्टरल मिक्स्ड टीममध्ये रौप्य पदक मिळवले. पॅरिस ऑलिम्पिकच्या वेबसाइटनुसार डान्स करणं हे डिकेकच्या आवडत्या गोष्टींमध्ये येतं.