दुबई : ICC कडून जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीच्या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या फलंदाजांच्या यादीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही भारतीय खेळाडू पहिल्या दोन स्थानांवर भक्कम पाय रोवून उभे आहेत. तर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला गोलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान मिळालं आहे.
मुख्य म्हणजे कोरोना व्हाय़रसच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रकारच्या क्रिकेट सामन्यांवर बंदी आणूनही कोहली (८७१ गुणांसह) आणि रोहित शर्मा (८५५) गुणांसह या यादीत क्रमश: प्रथम आणि द्वितीय स्थानावर आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं झिम्बाब्वेविरोधातील ३ सामन्यांमध्ये २२१ धावा करत या दोन्ही खेळाडूंपासूनचं अंतर काही प्रमाणात कमी केलं. त्याला ८ रेटींग गुणांचा फायदा झाला. पण, तरीही तो तिसऱ्याच स्थानावर आहे.
झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलर आणि सीन विलियम्सला मालिकेमध्ये शतक ठोकण्याचा फायदा झाला. ज्यामुळं टेलर ९ पाय़ऱ्यांनी वर म्हणजेच ४२ व्या स्थानावर आला.
गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या स्थानावर आहे. त्यामागोमागच भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला स्थान मिळालं आहे.