Mahakumbh 2025 : परत जा, परत जा...! महाकुंभला चहूबाजुंनी वाहतूक कोंडीचा वेढा; पोलीस यंत्रणा बेजार

Mahakumbh 2025 : महाकुंभसाठी जाण्यच्या विचारात असाल तर आधी सावध व्हा. तिथं नेमकी का. परिस्थिती हे एकदा पाहूनच घ्या... सोशल मीडियावरील ट्विट विचार करायला भाग पाडणारे   

सायली पाटील | Updated: Feb 10, 2025, 10:14 AM IST
Mahakumbh 2025 : परत जा, परत जा...! महाकुंभला चहूबाजुंनी वाहतूक कोंडीचा वेढा; पोलीस यंत्रणा बेजार  title=
Mahakumbh 2025 huge traffic jam on Jabalpur Katni Rewa Prayagraj road to go to Maha Kumbh mela

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळ्यानं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. अनेक साधुसंतांनी या महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी संगम नगरी गाठली. किंबहुना कुंभमेळा आता समारोपाच्या दिशेनं जात असतानाही अनेकांचेच पाय प्रयागराज इथं वळत आहेत. रेल्वेसोबतच रस्तेमार्गानंही इथं येणाऱ्यांचा आकडा मोठा असून, प्रयागराजमध्ये अतीप्रचंड वाहतूक कोंडी सध्या पोलीस आणि वाहतूक यंत्रणेच्या डोकेदुखीचं कारण ठरताना दिसत आहे. 

प्राथमिक माहितीनुसार जबलपूर, कटनी आणि रीवा इथून प्रयागराजच्या दिशेनं येणाऱ्या सर्व वाटांवर  प्रचंड वाहतूक कोंडी असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. रविवारीसुद्धा जबलपूर, कटनी इथं हीच स्थिती होती. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत असून, त्यामुळं रीवा- प्रयागराज मार्गावर तोबा गर्दी आहे. जवळपास 10 ते 20 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा असल्यामुळं या कोंडीत सापडलेल्या भाविकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

हेसुद्धा वाचा : कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात तडकाफडकी बदल; प्रवाशांनो आधी ही बातमी पाहा 

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सीमा भागातही वाहनांच्या रांगा असून, इथं किमान 5000 वाहनं एकाच जागी थांबल्याचं पाहायला मिळत आहे. तर, जबलपूरपासून जवळपास 40 किमी आधी असणाऱ्या सिहोरा, जबलपूर मार्गावर 11 किमीपर्यंत वाहतूक कोंडी आहे. सदरील परिस्थिती पाहता पोलिसांनी कटनी, मैहर, सतना, रीवा आणि चाकघाट अशा ठिकाणांवरच वाहनांना रोखण्यास सुरुवात केली असून, प्रयागराजला जाणाऱ्या वाटांवर वाहतूक कोंडी असल्याचं भाविकांना सूचित केलं जात आहे. 

वाढती गर्दी प्रशासनाला महागात... 

प्रयागराज इथं दर दिवशी वाढणारी भाविकांची गर्दी प्रशासनाच्या डोकेदुखीचं कारण ठरत आहे. इतकं की, आता प्रशासनानंच भाविकांना माघारी पाठवण्यास सुरुवात केली आहे. दमरम्यान पोलीस अधिकाऱ्यांचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत असून, इथं ते भाविकांना वास्तवदर्शी चित्र समोर ठेवताना दिसत आहे. 

प्रयागराजमधील या वाहतूक कोंडीचे थेट परिणाम सोशल मीडियावरही पाहायला मिळत असून, नेटकऱ्यांनी- प्रत्यक्षदर्शींनी प्रयागराजच्या दिशेनं जाणाऱ्या वाटांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तर काहींनी गुगल मॅपवर दिसणारी वाहतूक कोंडीची पूर्वसूचनाही सर्वांसमक्ष आणत इथं येणाऱ्या सर्वांनाच सावध केलं आहे. हनुमानाच्या शेपटीसारखी वाहनांची रांग इथं पाहायला मिळत असून, तिची सुरुवात आणि शेवटच सापडत नाहीय असंही म्हणत काही नेटकऱ्यांनी या वाहतूक कोंडीचं वास्तव समोर आणलं आहे.