Parshuram Jayanti 2024 : कोकणात 'महेंद्रगिरी' डोंगरावर वसलंय परशुरामाचं मंदिर, वास्तुकलेचा विशेष नमुना

परशुरामाचा जन्म हा तृतीया तिथीच्या काळात झाला होता. जेव्हापण अधर्म आणि पाप वाढते तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी परशुरामाचा जन्म होतो. आज परशुराम जयंती आहे या निमित्ताने कोकणातील परशुरामाच्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 

सनातन धर्मात परशुराम जयंतीला खूप महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला होता. विष्णूचा सहावा अवतार म्हणून परशुरामाला ओळखलं जातं. शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हा दिवस साजरा केला जातो. यंदा 10 मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. यानिमित्ताने आज आपण कोकणताली चिपळूण येथील 'महेंद्रगिरी' डोंगरावर वसलेल्या परशुरामाच्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. 

1/7

निसर्गाने नटलेलं परशुराम मंदिर

Parshuram temple Chiplun

महेंद्रगिरी डोंगरावर वसलेलं परशुरामाचं मंदिर आणि समोर वाशिष्ठी नदीचा प्रवाह असं मोहक असं निसर्गाचं रुप तुम्हाला येथे अनुभवायला येतं. मुंबई-गोवा हायवेवरील परशुराम मंदिर हे अतिशय लोकप्रिय असा सनसेट पॉईंट आहे. 

2/7

परशुराम मंदिराचा इतिहास

Parshuram temple Chiplun

परशुराम येथील भगवान परशुरामांचे मंदिर इ. स. 570 मध्ये बांधण्यात आले, चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसविले गेले.  दक्षिण गुजरातमधून समुद्रमार्गे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यज्ञऋषींना आणले गेले. तेच पुढे चित्त्पावन म्हणून प्रसिद्ध झाले,अश्वमेध, राजसूय यांसारखे सर्वांत मोठे यज्ञ केले जात. तेव्हा यज्ञपती म्हणून भगवान परशुरामांच्या मंदिराची प्रतिष्ठापना यज्ञभूमीजवळ केली.

3/7

परशुरामाचा जन्मोत्सव

Parshuram temple Chiplun

प्रभू प्रशुरामाचा जन्म हा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला होता. त्यामुळे मंदिरात तीन दिवस उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने मंदिराचा परिसर सुशोभित केला जातो. एवढंच नव्हे तर किर्तन आणि भजनाचाही कार्यक्रम असतो. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 

4/7

मंदिराची वास्तुकला

Parshuram temple Chiplun

परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो. मंदिराचे घुमट बघताना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत.उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे.

5/7

बेगमने बांधला घुमट

Parshuram temple Chiplun

आदिलशहाच्या बेगमेची तारवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला की, तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची तारवे खरोखरच सुखरूप पणे किनाऱ्याला लागली. परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला. या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे.

6/7

निसर्ग रम्य परिसर

Parshuram temple Chiplun

कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणार्‍या कौलारू घरांची रचना असलेलं परशुराम हे गाव आहे., या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर या मंदिराला आवर्जून भेट देण्यासारखी आहे. 

7/7

कसे पोहोचाल?

Parshuram temple Chiplun

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणपासून 4 कि मी अंतरावर हे मंदिर वसलं आहे. चिपळूणपर्यंत तुम्ही कोकण रेल्वे किंवा एसटीने जावू शकता.  मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीच्या महेंद्रगिरी डोंगवर परशुराम मंदिर वसलं आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही 'परशुराम' किंवा 'लोटे परशुराम' असे म्हटले जाते.