रविवारची फिस्ट...

संदीप साखरे शनिवारची उशिराने झालेली रात्र... रविवारची पहाटे 10 पर्यंतची साखरझोप.. चहाच्या पेल्याबरोबच मित्रांचे आलेले फोन... आणि मग विनाअंघोळीची बाईकवरुन किंवा कारमधून लांबवर कुठेतरी मारलेली रपेट..

Updated: Jan 8, 2012, 09:09 PM IST

संदीप साखरे

sandip.sakhare@zeenetwork.com

 

शनिवारची उशिराने झालेली रात्र... रविवारची पहाटे 10 पर्यंतची साखरझोप.. चहाच्या पेल्याबरोबच मित्रांचे आलेले फोन... आणि मग विनाअंघोळीची बाईकवरुन किंवा कारमधून लांबवर कुठेतरी मारलेली रपेट.. मग सगळ्या चर्चा , गंमत संपल्यानंतर पोटात झालेली भूकेची जाणीव... आणि मग कुठेतरी फक्कड ठिकाणी नाश्ता म्हणताना सगळयांनीच आटोपलेलं जेवण... रविवारच्या सुखाची कल्पना ही माझ्यासाठी अशी आहे.
रोजच्या धकाधकीत दोन-तीन तास लोकलने झालेला प्रवास आणि मुंबईचं तेचतेच दर्शन, यामुळं मरगळलेल्या मनाला पुन्हा जिवंत करणारी ही भटकंती आणि नवे विचार यासारखी गंमत नाही.. शनिवारी रविवारी या दोन दिवसाच्या सुट्टीत लोकलने मुंबईच्या दिशेने प्रवास करायचा नाही, असा आमच्या काही मित्र मंडळींचा पण आहे.. तसचं आठवड्यात कामाच्या वेळी कुठेही म्हणजे मुंबईत, ठाण्यात, नवी मुंबईत, पुण्यात, नाशकात अशा आसपासच्या ठिकाणी असलेली ही मंडळी शनिवारी आणि रविवारी मात्र न चुकता बदलापूरकडं धावत असतात..

 

एरवी सकाळी दहाच्या सुमारास लोकलनं रिकामं केलेलं बदलापूर शनिवारी आणि रविवारी मात्र फुलून आलेलं असतं. प्रत्येकाच्या ठरलेल्या नाक्यावर कोणत्याही घरच्या कपड्यांत तासनतास एकमेकांशी सिगरेटी, चहांची देवाणघेवाण करत गप्पा मारत बसलेली तुम्हाला नक्की दिसतील.. बर एरवी यातली बरीशची मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर असलेली..तरीही त्यांची कोणतीही भीडभाड न ठेवता शनिवारी आणि रविवारी मात्र हे बदलापूर सुख लुटायला सगळेच येतात.. यामागं असतं बदलापूरचं प्रेम.. एरवी कोणीही बदलापूर लांब म्हणून त्याला टाकून बोललेलं या मंडळींना आवडत नाही, कारण त्यांना बदलापूरची मजा ठाऊक असते..

 

[caption id="attachment_1402" align="alignleft" width="300" caption="फक्त धम्माल...."][/caption]

शहरी आणि ग्रामीण अशी दोन्ही रुपं धारण केलेलं बदलापूर म्हणूनच मग सगळ्यांचं वीक एन्ड डेस्टिनेशन असंत.. कुठेतरी तळ्यावर, मुळगावच्या खंडोबाच्या मंदिरात, बारवी डॅम परिसरात, तिथून पुढे टिटवाळा ते थेट माळशेजपर्यंत, तर कुठे कोंडेश्वर, कुठल्यातरी रेनी रिस़ॉर्टवर, वांगणी, नेरळ, कर्जत ते पार खंडाळा लोणावळ्यापर्यंत बदलापूरकरांना फिरायला फार आवडतं.. आणि मग त्यातही कोणी ऑफिसची मित्र मंडळी आली तर धम्मालच.. बदलापूरकरांमध्ये असचं एक आवडतं ठिकाण म्हणजे मुळगाव..

 

बदलापूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावानं अजून आपलं गावपण टिकवून ठेवलय.. तशी आजूबाजूची गावही आहेतच, मात्र इथला खंडोबा आणि मामांचं हॉटेल हे बदलापूरसाठी मुख्य आकर्षण.. बारवी डॅमकडे फिरायला गेलेल्या सगळ्याच मंडळीचे पाय या टपरीवजा ह़ॉटेलकडे नक्की वळतात.. मोठमोठ्या चारचाकी गाड्या इथं थांबतात.. आणि मग सुरु होते खाद्ययात्रा.. गरमागरम गरम वडे आणि त्यासोबत असणारा ठेचा हे या ठिकाणचं खास वैशिष्ठ्य.. त्याचबरोबर मग जबरदस्त तर्री असलेली मिसळ वगैरे सोबतीला आलचं.. मुख्य अट एकच तिखटं खाण्या-यांनीच या ठिकाणी यावं..

 

उकडलेल्या बटाट्यात हळद, कोथिंबीर, थोडासा ठेचा याचं तयार केलेलं मिश्रण, डाळीच्या पिठातून काढून तेलाच्या कढईत टाकलेले वडे आणि गि-हाईकांची वर्दळ आणि मामांकडून गि-हाईकांचं होणारं स्वागत.. यामुळं एक मजाच याठिकाणी असते.. बरीच मंडळी या ठिकाणी वड्यांवर आणि रश्यावर ताव मारत बसलेले असतात.. पूर्वी लहान असलेल्या या हॉटेलचा आता बराच विस्तार झाला आहे. पूर्वी ठेचा आणि वड्यापुरतीच मर्यादा होती, आता त्यात चिकन आणि मटन थाळीही आली आहे.. पण एवढं होऊनही मुख्य वड्याकडे दुर्लक्ष झालेलं नाही आणि फारसा झगमगाटही आलेला नाही. त्यामुळे या वाटेवर आलं की इथं मंडळी हटकून थांबतातच..

[caption id="attachment_1403" align="alignleft" width="300" caption="चविष्ट, चटकदार"]

Tags: