मुरादनगर: मोबाईल चार्जिंग सुरु असताना इयरफोननं गाण ऐकणाऱ्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. विशाल कुमार असं त्याचं नाव आहे. विशाल हा 11वी मध्ये शिकणारा विद्यार्थी होता. उत्तर प्रदेशच्या मुरादनगरमध्ये ही घटना घडली आहे.
बुधवारी रात्री साडे नऊ वाजता इयर फोन लावून विशाल गाणी ऐकत होता. गाणी ऐकत असतानाच मोबाईलची बॅटरी लो झाल्यामुळे त्यानं मोबाईल चार्जिंगला लावला.
त्यावेळी विशाल खोलीमध्ये एकटाच होता. अचानक विशालच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं त्याच्या घरचे खोलीमध्ये आले तेव्हा विशाल बेशुद्ध अवस्थेमध्ये होता. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.
मोबाईल चार्जिंगचा करंट इयरफोनच्या लीडमध्ये गेल्यामुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे, तर चार्जरचा स्फोट झाल्यामुळे हा मृत्यू झाला असल्याचंही बोलंल जात आहे.