मुंबई : वेस्ट इंडिजचा बॅट्समन क्रिस गेलनं ऑस्ट्रेलियात बिग बॅश खेळताना महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केलं होतं. या सगळ्या वादावार क्रिस गेलनं आपल्या आत्मचरित्रामध्ये भाष्य केलं आहे. क्रिकेटपटू ऍन्ड्रू फ्लिंटॉफ, इयन चॅपल आणि क्रिस रॉजर्सनी गेलच्या या वागणुकीवर टीका केली होती. त्याला गेलनं आपलं आत्मचरित्र सिक्स मशीनमधून प्रत्युत्तर दिलं आहे.
टी 20 क्रिकेट खेळत असताना मी ते वक्तव्य केलं होतं, हे काही टेस्ट क्रिकेट नाही की जे गंभीरपणे खेळलं जावं. त्या पत्रकाराची छेड काढण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. मी मस्करी करत होतो, असं गेल आत्मचरित्रामध्ये म्हणाला आहे.
या वादानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि गेलचा समरसेट काऊन्टीमधला सहकारी क्रिस रॉजर्सनं गेलवर टीका केली होती. अशी वक्तव्य करून गेल तरुण खेळाडूंना चुकीचं उदाहरण देत असल्याचं रॉजर्स म्हणाला होता. पण रॉजर्स हा ढोंगी आहे, माझ्याबरोबर बारमध्ये घालवलेल्या रात्री तो कसा विसरू शकतो, असं गेल म्हणाला आहे.
तर व्हायग्रा घेऊन टेस्ट खेळणाऱ्या फ्लिंटॉफनं मला लेक्चर देऊ नये, असं प्रत्युत्तर गेलनं दिलं आहे.
महिला पत्रकाराबरोबर असं वर्तन केल्यामुळे गेलवर जगभरात बंदी घालण्यात यावी अशी मागणी इयन चॅपल यांनी केली होती. त्यावरही गेलनं भाष्य केलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी इयन चॅपलनं एका क्रिकेट अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली होती. इयन चॅपलनं क्रिकेटवरच बंदी घालावी असं गेल या पुस्तकात म्हणाला आहे.
बिग बॅश लीगमध्ये 15 बॉलमध्ये 41 रन केल्यानंतर ही महिला प्रेजेंटर गेलला प्रश्न विचारायला गेली, तेव्हा तुला पाहण्यासाठी मी ही खेळी केली. मला तुझी मुलाखत घ्यायची होती, आज मॅचनंतर आपण ड्रिंक्स घ्यायला जाऊ असं गेल कॅमेरासमोर म्हणाला होता.