www.24taas.com, मुंबई
खराब फॉर्मशी लढत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बचावासाठी पाच वेळचा विश्व विजेता बुद्धीबळ खेळाडू ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद पुढे सरसावला आहे. सचिनला वाटते तोपर्यंत त्याने क्रिकेट खेळावे, असा सल्ला विश्वनाथन आनंदने दिला आहे.
टीका तर होत राहणार, तुम्हांला जर खेळातून आनंद मिळत असेल तर विनाकारण खेळ सोडणे चुकीचे आहे. खेळात असे काही नाही की युवा खेळाडूच चांगले प्रदर्शन करतात. मी अजूनही बुद्धीबळ खेळू इच्छितो, असा सचिनला आधार देणारे वक्तव्य आनंद याने केले आहे.
मी खूप भाग्यवान आहे की, मी सध्या खेळत आहे. मी सचिनसाठीही असाच विचार करतो. चाळीस हा एक केवळ आकडा आहे. त्यामुळे वयाबद्दल बोलणे हे हास्यास्पद आहे, असेही आनंद याने ठामपणे सांगितले.
लोक सर्वात प्रथम विचारतात की तुम्ही निवृत्ती कधी घेणार आहेत. हे हास्यास्पद आहे. माझ्या कालखंडात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि टेनिस स्टार लिएंडर पेस हे महान खेळाडू आहे, असेही आनंद याने सांगितले.
मी लिएंडरला खूप खेळताना पाहिले आहे. सचिन आणि मी खूप वर्षांपासून खेळत आहोत. सौरवनेही खूप चांगली कामगिरी केली.