श्रीहरी अणे यांना अखेर पद सोडावं लागले, दिला राजीनामा

राज्याच्याच्या महाधिवक्ते पदी असताना केलेले वेगळ्या मराठवाड्याचं समर्थन करणारे श्रीहरी अणे यांना अखेर आपलं पद सोडावं लागलंय.  

Updated: Mar 22, 2016, 11:14 AM IST
श्रीहरी अणे यांना अखेर पद सोडावं लागले, दिला राजीनामा title=

मुंबई : राज्याच्याच्या महाधिवक्ते पदी असताना केलेले वेगळ्या मराठवाड्याचं समर्थन करणारे श्रीहरी अणे यांना अखेर आपलं पद सोडावं लागलंय. आज सकाळी १० वाजणाच्या सुमारास अणेंनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

अणे यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले होते. शिवसेनेसह विरोधकांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात विधानसभेत सरकारची भूमिका मांडणार आहेत. 

अणेंच्या राजीनाम्यामुळे शिवसेना शांत राहणार की त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. त्याचबरोबर या प्रकरणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते हे सुद्धा पाहावे लागणार आहे.

 

महाधिवक्ता अणे यांना पदावरून दूर करावे, अशा आशयाचे ठराव शिवसेना तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीने मांडले आहेत. अणे यांचा राजीनामा किंवा त्यांना पदावरून दूर केल्याची घोषणा मंगळवारी सरकारकडून न झाल्यास हे ठराव चर्चेला घेण्याची मागणी विरोधकांबरोबरच शिवसेनेकडून केली जाणार होती. त्या पार्श्वभूमीवर अणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.