www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्याचे उद्या सोमवारपासून सुरू होणारं चार दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजणार असल्याची चाहूल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच लागलीय. कारण विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आदर्श घोटाळा, टोल, वीज आणि एलबीटीच्या मुद्यांवरून सरकारला घेरणार असल्याची घोषणाच केलीय.
विरोधकांनी या सर्व मुद्यांवर सरकारनं भूमिका स्पष्ट केली नाही तर राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही विरोधकांनी दिलाय. तसंच आचारसंहिता लागू झालेली नसतानाही सरकारनं चार दिवसांचंच अधिवेशन का ठेवलं असा सवालही विरोधकांनी सरकारला केलाय. त्यामुळं केवळ चार दिवसांच्या अधिवेशनात नेमकी किती वेळ चर्चा होणार आणि गदारोळामुळं किती वेळ कामकाज चालणार अशी शंका व्यक्त होत आहे.
आघाडी सरकारचं हे अखेरचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकार जनतेच्या झोळीत काय टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधीवेशना पूर्वसंध्येला मुख्यंमंत्र्यांनी आयोजीत केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलाय. शिवसेना-भाजपसह मनसेनंही हा बहिष्कार टाकलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.