अधिवेशनचा शेवटचा दिवस... कोण येणार बॅकफूटवर?

फडणवीस सरकारच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे.अधिवेशन संपतांना सत्ताधाऱ्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवत अत्यंत आक्रमक असलेल्या विरोधकांना शेवटी बॅकफूटवर येण्यास भाग पाडलंय.

Updated: Jul 31, 2015, 09:37 AM IST
अधिवेशनचा शेवटचा दिवस... कोण येणार बॅकफूटवर? title=
फाईल फोटो

मुंबई : फडणवीस सरकारच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे.अधिवेशन संपतांना सत्ताधाऱ्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवत अत्यंत आक्रमक असलेल्या विरोधकांना शेवटी बॅकफूटवर येण्यास भाग पाडलंय.

पहिले काही दिवस सरकार विरोधात विधानसभा असेल किंवा विधानपरिषद असेल विरोधकांनी सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर आंदोलने करत अधिवेशन दणाणून सोडलं. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी विषयावर केलेल्या मॅरेथॉन भाषणामुळे आणि उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे विरोधकांची हवाच काढून घेतली. त्यामुळे विरोधकांचा या भाषणानंतर जोर कमी झाल्याचं दिसलं.

असं असताना शेवटच्या आठवड्यात ख़ास करून संख्याबळ जास्त असलेल्या विधानपरिषदमध्ये मंत्र्यांवर गैरव्यवहार असलेल्या आरोपांवर विरोधकांनी चर्चा घडवून आणली. तेव्हा सरकार बॅकफूटवर जाणार असं दिसत असताना गेल्या 15 वर्षातील आरोप असलेल्या विभागातील ई - टेंडरिंग खरेदीच्या चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि पुन्हा एकदा सत्ताधारी विरोधकांवर भारी पडले. 

आज शेवटच्या दिवशी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी का होईना विरोधक सरकारला अडचणीत आणतात का? हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या अधिवेशनाचा एक आठवडा वाया गेला आहे. ललित मोदी तसंच व्यापम घोटाळा प्रकरणावरून सरकार आणि विरोधक यांच्यात डेडलॉक कायम आहे. विरोधकांनी सहकार्य करावे, यासाठी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी घेतलेल्या बैठकीचाही काँग्रेसवर परिणाम झालेला नाही. त्यामुळे आजसुद्धा सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान यांचा राजीनामा हाच मुद्दा काँग्रेसच्या अजेंड्यावर असणार आहे. त्यामुळे कोंडीत सापडलेलं मोदी सरकार काय भूमिका घेतं याकडेच लक्षं असणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.