मुंबई : शिवसेना-भाजप युती तोडण्यासाठी भाजपचे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांचा हात असल्याची चर्चा रंगत आहे. यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, असा सेनेचा आदेश अल्याचे बोलले जात होते. मात्र, मी पाडापाडीचं राजकारण करत नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत.
महायुती तोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेच्या रडावर असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. भाजप नेते विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि आशिष शेलार यांचा पराभव करण्याचे आदेशच शिवसेना नेतृत्वानं दिल्याचं बोललं जातयं. मात्र आमचे नेते मोठ्या फरकानं निवडून येतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर आमचं लक्ष्य केवळ सत्ता मिळवण्याचं असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
ज्यांनी युती तोडली त्यांना पाडायचे आदेश तुम्ही दिले आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता मी पाडापाडीचं राजकारण करत नाही, मला जिंकायचे आहे आणि मी जिंकणारच, त्यासाठीच लढाई लढत आहे. मला कुणाचे वाईट करायचे नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.