www.24taas.com, मुंबई
राज्यात उद्यापासून गुटखाबंदी लागू होणार आहे. तशी बंदीची मोहोर मंत्रिमंडळात आज उमटली. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुटखाबंदीच्या शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्यावर टीकाही झाली होती. मात्र, राज्य सरकराने धाडसी निर्णय घेत अंमलबजावणी केली आहे.
गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे उद्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. ही बंदी गुटखा आणि पानमसाल्याचं उत्पादन, विक्री आणि साठा यावर घालण्यात आलीय. याबाबतची अधिसूचना उद्या जारी होणार आहे.
बंदीबाबत विचार सुरू होता. त्यासाठी अन्न औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात ११७३ पानमसाला आणि गुटख्यांचे नमुने तपासले त्यापैकी ८५३ नमुन्यांमध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट मोठ्या प्रमाणात आढळले त्यामुळे सार्वजनिक हितासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचं सांगत मनोहर नाईक यांनी गुटखाबंदीची घोषणा केली. ही बंदी एक वर्षासाठी असेल. गुटखाबंदीचा कालावधीपूर्ण होण्याच्या आधीच पुन्हा गुटखा बंदीला मुदतवाढ देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अन्न सुरक्षा विधेयक २००६ अन्वये ही बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारचा १०० कोटींचा महसूल बुडणार आहे. गुटखा सेवन करणे, विक्री करणे या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट हा आरोग्याला अतिशय हानिकारक पदार्थ आहे. त्यामुळे इतर कोणत्याही गुटखा अथवा पानमसाला सारख्या पदार्थात जर मॅग्नेशियम कार्बोनेट आढळून आलेल्या पदार्थांवर सुध्दा बंदी लागू केली आहे. तसेच मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या सर्व पदार्थांवर कडक बंदी घालण्यात आली आहे. गुटखा बंदीच्या निर्णयात देशात महाराष्ट्र राज्य हे चौथे राज्य ठरले आहे.