औरंगाबाद : तुम्ही STच्या खिडकीतून रुमाल किंवा बॅग टाकून कधी विंडो सिट पकडलीये का? नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्हाला अशा सिट पकडणाऱ्यांमुळे त्रास तर नक्कीच झाला असणार. यापुढे तुम्हाला हा त्रास होणार नाही. कारण आता स्टँडमध्ये गाडी शिरताना बसच्या काचा बंद असणार आहेत.
अशा प्रकारे रुमाल आणि बॅग एसटीच्या खिडकीतून टाकून जागा अडवल्यामुळे लहान मुलं, स्त्रिया आणि वृद्ध प्रवाशांनी अनेकदा सीटच मिळत नाही. अनेकदा बसमधल्या भांडणांना हे खिडकी-बुकिंगच कारणीभूत असतं. पण आता हे चित्र लवकरच बदलणार आहे. एसटी महामंडळानं एक परिपत्रक काढलंय. त्यानुसार बस स्थानकात शिरण्यापूर्वी कंडक्टर सगळ्या खिडक्या बंद करून घेणार आहे.
सततच्या भांडणांना कंटाळलेले वाहक-चालक आणि नियंत्रकांनीही याचं स्वागत केलंय. खिडकीतून रुमाल टाकणं बंद झाल्यामुळे प्रथम येणाऱ्या प्रवाशांना आधी जागा मिळेल. त्यामुळे प्रवाशांमध्येही या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण आहे.