शनी शिंगणापूरच्या वादावर आता न्यायालय देणार निर्णय...

शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा वाद आता कोर्टाच्या पायरीवर पोहचलाय.

Updated: Jan 28, 2016, 02:21 PM IST
शनी शिंगणापूरच्या वादावर आता न्यायालय देणार निर्णय... title=

शनी शिंगणापूर : शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा वाद आता कोर्टाच्या पायरीवर पोहचलाय.

जालन्याच्या डॉक्टर वसुधा पवार यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याविरुद्ध जनहित याचिका दाखल केलीय.

या याचिकेनंतर शनी देवस्थान, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आलीय. मात्र, याबाबत कोणताही अंतरीम आदेश देण्यास न्यायालयानं नकार दिलाय.

या प्रकरणाची पुढची सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका केली स्पष्ट 

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'भूमाता ब्रिगेड'च्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. 'ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही. मंदीर प्रशासनाने पुढाकार घेवून चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्न सोडविले पाहिजेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, नगर यांना सूचना दिल्या आहेत की संघर्ष टाळून संवाद प्रस्तापित करावा. समाजातील अग्रजांनी त्यामध्ये पुढाकार घ्यावा' असं ट्विट त्यांनी केलंय.