ठाणे : नालासोपाऱ्यात दिवसा-रात्री बाईकवर भरधाव वेगानं येऊन महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोन चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
नालासोपारामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर म्हणून नालासोपारा शहराकडं पाहिलं जातंय. रात्री अपरात्री कामावरुन येणाऱ्या महिलांची संख्या या परिसरात जास्त आहे. अशाच महिलांना निर्जनस्थळी गाठून, मोटरसायकलवर भरघाव वेगाने येऊन त्यांची सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत टोळीने शहरात दहशत पसरविली होती. याच टोळीतील दोन सराईत सोनसाखळी चोरांना सीसीटीव्हीच्या आधारे पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सहा गुन्ह्यांचा उलघडा झाला असून एकशे वीस ग्राम सोने आणि एक यामाहा कंपनीची बाईक जप्त केलीय.
नालासोपारा पोलीस ठाण्यात मागच्या अनेक दिवसांपासून रस्त्याने जाणाऱ्या, येणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने मोटरसायकलवरुन येऊन जबरदस्तीने हिसकावून पळून जाणारी टोळी कार्यरत होती. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घटनांनी पोलिसही हैराण झाले होते. मुख्य रस्त्यावरील सिसिटीव्ही फूटेजचा आधार घेऊन नालासोपारा पूर्व मोरेगाव विनायक नगर येथील मुन्ना हकीम शेख आणि कमल हसन हुसेन शेख या दोघांना सापळा रचून अटक केलीय. कमल हसन शेख हा पश्चिम बंगाल येथील उत्तर चौविस जिल्ह्यातील बारासत तालुक्यातील बोनगा गावचा रहिवाशी आहे.
बुरख्यात दिसणारे मुन्ना हकीम शेख आणि कमल हसन हुसेन शेख हे दोघे मागील अनेक महिन्यापासून यामाहा कंपनीची मोटरसायकल क्र. 705 वरून भरघाव वेगात येऊन एकट्या दिसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून फरार होत असत.
सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत रस्त्याने जाणाऱ्या महिलांना लुटलं जायचं. यामुळे प्रवाशी महिलांत मोठ्याप्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार होणाऱ्या घटनेने नालासोपारा पोलिसांनी विशेष पथक तयार करुन साफ़ळा रचून सीसीटीव्हीच्या आधारे दोन सराईत सोनसाखळी चोरांना अटक केलीय. त्यांच्याकडून एकशे वीस ग्राम सोने, यामा कंपनीची मोटरसायकल असा दोन लाख पंच्यान्व हजार सातशे वीस रुपयांचा माल जप्त केलाय. पोलीस या चोरांच्या अन्य साथीदारांचाही शोध घेत आहे. शिवाय यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.