मुंबई : लाखांचा पोशिंदा असलेल्या बळीराजापुढे जगण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शेतक-यांनी खरेदी केंद्रावर आणलेली तूर खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं खरं. मात्र अजूनपर्यंत तूर खरेदी केंद्रंच सुरु झालेली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत.
दुसरीकडे द्राक्ष पिकांचे भाव कधी नव्हे इतके घसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. डाळींबालाही बाजारात भाव नसल्याचंच दिसून आलंय. परिणामी डाळींब उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. फळपिकांची अशी दयनीय स्थिती आहे, तर जेवणाला चव देणारा कांदा मात्र शेतक-यांना सततच रडवत असतो.
पिक आलंय मात्र त्याला भावच नाही, अशी विचीत्र कोडींची परिस्थिती पिकवत्या हातांसमोर निर्माण झाली आहे. जेवढा खर्च उत्पादन घेण्यावर केलाय, तेवढा खर्चही निघत नसल्याचा शेतक-यांचा आक्रोश आहे. त्यामुळे जगायचं कसं हाच प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे.
दरम्यान, तूर खरेदी केंद्रावर २२ एप्रिलपर्यंत आलेली सर्व तूर खरेदी केली जाईल असं आश्वासन सरकारनं दिलं असलं तरी, प्रत्यक्षात एकाही खरेदी केंद्रावर अजूनही तूर खरेदी सुरु झालेली नाही. विशेष म्हणजे तूर विकण्यासाठी २२ एप्रिल पूर्वीपासूनच अनेक शेतकरी खरेदी केंद्राबाहेर ताटकळत बसून आहेत. रात्र रात्र जागून आपली तुरीची रखवाली करण्याशिवाय या शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाही.
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यामधलं नाफेडचं तूर खरेदी केंद्र. २२ एप्रिलपूर्वीच अर्धापूर तालुक्याच्या आसपासच्या 5 तालुक्यांतल्या शेतक-यांनी मोठ्या आशेनं आपली तूर इथे विक्रीसाठी आणली. त्याचं त्यांना टोकनही मिळालं. अशी तब्बल ६ हजार क्विंटल तूर इथे सध्या खरेदीच्या प्रतीक्षेत आहे.
विशेष म्हणजे अर्धापूरच्या तूर खरेदी केंद्रावर साधी वीज आणि पाण्याचीही व्यवस्था नाही. अशाही परिस्थितीत आपल्या लाख मोलाच्या तूरीची दिवसरात्र राखण करण्याची वेळ या पिकवत्या हातांवर आली आहे. झी 24 तास या खरेदी क्रेंद्रावर रात्रीच्या सुमाराला पोहोचली, तेव्हा गैरसोईंचा सामना करत तूरीची राखण करत असलेले शेतकरी पाहायला मिळाले.
२२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूर विकत घेतली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं खरं. मात्र प्रत्यक्षात एकाही खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरु झालेली नाही. तर नाफेडचा एकही अधिकारी तूर खरेदी केंद्रावर २२ एप्रिलनंतर फिरकलेलाच नाही. त्यामुळे कष्टानं पिकवलेल्या या पिवळ्या सोन्याच्या चिंतेनं, हा हतबल शेतकरी पूरता पोखरला गेला आहे.