www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग
वर्णभेदाविरुद्ध लढ्याचं नेतृत्व करणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना हॉस्पीटलमधून घरी हलवण्यात आलंय. असं असलं तरी त्यांची प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक स्थितीत कायम आहे. त्यांच्यावर यापुढे घरीच उपचार करण्यात येणार आहेत.
प्रिटोरिया रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. या काळात त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे सध्या प्रकृती स्थिर आहे. तरीही त्यांच्यावर हॉग्टनमधील घरात उपचार सुरूच राहणार आहेत, असे राष्ट्राध्यक्ष जॉकोब झुमा यांनी सांगितले.
८ जून रोजी मंडेला यांच्या फुफ्फुसात झालेल्या संक्रमणानंतर त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिथंच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता त्यांच्यावर उपचार करण्याची सगळी सुविधा त्यांच्या घरीच उपलब्ध करून देण्यात आलीय. गरज पडल्यास त्यांना पुन्हा हॉस्पीटलमध्ये हलवण्यात येईल.
नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले काळे राष्ट्रपती... १९९४ ते १९९९ पर्यंत त्यांनी हे पद भूषविलं. १९९३ मध्ये त्यांना नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली त्यांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.