नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला असणारा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंताजनक माहिती 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप' (एसपीजी) आणि देशातल्या सर्व महत्वाच्या गुप्तहेर यंत्रणांनी दिलीय.
त्यामुळे यंदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून भाषण देताना मोदींनी बुलेटप्रुफ काचेच्या मागून देशाला संबोधित करावं, अशी मागणी एसपीजीनं केलीय.
त्यासाठी देशाचे सुरक्षा सल्लागार आणि मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी अजित डोवाल यांच्याकडे पंतप्रधानांची समजूत काढण्याची विनंती करण्यात आलीय.
पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी लालकिल्यावरून दोन भाषणं केली आहेत. पण दोन्ही भाषणांच्या आदल्या दिवशी त्यांनी बुलेटप्रुफ काचा काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. यंदा मात्र मोदींनी तसं करू नये अशी विनंती 'एसपीजी'नं केलीय.
मोदींवर हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर होण्याची भीती व्यक्त करणारं एक संभाषण सुरक्षा यंत्रणांच्या रेकॉर्डवर आलंय.
मोदींवरच्या हल्ल्याची भीती वाढण्याची दोन प्रमुख कारणं देण्यात आली आहेत. पहिलं म्हणजे जगभरात आयसिसद्वारे होत असलेले हल्ले आणि दुसरं म्हणजे काश्मीरमधली अस्थिर परिस्थिती...
पण आयसीस आणि अल कायदा यांसारख्या संघटनांव्यतिरिक्त लष्कर ए तोएबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, हरकत उल मुजाहिद्दीन अशा एकूण सात संघटना मोदींच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती वारंवार उघड झालीय.