बंगळुरु : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी, आरबीआयचे गव्हर्नर राजन यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. रघुराम राजन यांची पतधोरणाविषयीची कामगिरी लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ आणखी दोनवेळा वाढविण्याची गरज असल्याचे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना नारायण मूर्ती यांनी राजन यांच्याबाबत सुरु असलेल्या वादावर बोलताना त्यांना आणखी दोनवेळा गर्व्हनर पदावर राहण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
येत्या सप्टेंबरमध्ये राजन यांचा गव्हर्नरपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. परंतु सत्तेतील काही घटकांचा राजन यांच्या धोरणांना नेहमीच विरोध राहिला आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी राजन यांची पदावरुन त्वरित उचलबांगडी करावी यासाठी नरेंद्र मोदींना दोनवेळा पत्र लिहीले आहे.
नारायण मुर्ती यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक केले आहे. तसेच मूर्तींचे उत्तराधिकारी व इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या कामाचीदेखील त्यांनी प्रशंसा केली. भारताला आतापुरते नाही, तर आणखी दोन वेळा त्यांच्यासारख्या गव्हर्नर मिळाला तर ही देशासाठी गौरवशाली बाब ठरेल, असे प्रतिपादन मूर्ती यांनी केले.