'आयएनएस कोलकाता' नौदलाच्या ताफ्यात दाखल; पंतप्रधानांनी केलं राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ‘आयएनएस कोलकाता’ या अत्याधुनिक युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आलाय. 

Updated: Aug 16, 2014, 10:36 AM IST
'आयएनएस कोलकाता' नौदलाच्या ताफ्यात दाखल; पंतप्रधानांनी केलं राष्ट्रार्पण title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ‘आयएनएस कोलकाता’ या अत्याधुनिक युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आलाय. या युद्धनौकेचं वैशिष्ट्यं म्हणजे, ही युद्धनौका संपूर्ण पद्धतीनं भारतातच तयार करण्यात आलीय. या विशेष कार्याबद्दल नरेंद्र मोदींनी भारताच्या निर्माण क्षमतेचे आभार मानलेत. 

नौदलाचं सामर्थ्य वाढवणारी ही युद्धनौका कशी आहे, पाहुयात...
भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी नौदलाने माझगांव डॉकयार्डला तीन अत्याधुनिक विनाशिका म्हणजेच ‘डिस्ट्रॉयर’ची ऑर्डर 2000 मध्ये दिली. या तीन युद्धनौकांच्या वर्गाला कोलकाता क्लास असे नाव देण्यात आलं. या वर्गातील पहिली युद्धनौका आयएनएस कोलकाताच्या बांधणीला सप्टेंबर 2003 मध्ये सुरुवात झाली. मार्च 2006 मध्ये या युद्धनौकेचं जलावतरण झालं. तर चाचण्यांचे अनेक अडथळे पार पाडत अखेर ही युद्धनौका सज्ज झाली आहे.

या युद्धनौकेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट म्हणजे हिची वैशिष्ट्यपूर्ण रचना... विविध क्षमतेची रडार, पाणबुडीचा शोध घेणारी सोनार यंत्रणा, विविध पल्ल्यांच्या तोफा, पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे, युद्धनौकेवरुन हवेत मारा कऱणारी क्षेपणास्त्रं अशी वैविध्यपूर्ण अस्त्र या युद्धनौकेवर आहेत. मात्र, यापैंकी सर्वात संहारक शस्त्र आहे ते म्हणजे ब्राम्होस क्षेपणास्त्र...

पूर्ण क्षमतेनं सज्ज झाल्यास या युद्धनौकेचं वजन 7 हजार 500 टनाच्या घरात जाणार आहे. एका दमात ही युद्धनौका काही हजार किलोमीटरचा पल्ला सहज गाठू शकते. यावरील शक्तिशाली रडारामुळे तर 300 किलोमीटर पेक्षा जास्त अंतराच्या परिघात सहज नजर ठेवता येणार आहे. मुख्य गोष्ट म्हणजे या युद्धनौकेवरील 80 टक्क्यापेक्षा जास्त यंत्रणा या स्वदेशी बनावटीच्या आहेत. 

कोलकाता वर्गातील आणखी दोन युद्धनौका म्हणजे आयएनएस कोची आणि चेन्नई येत्या दोन वर्षात नौदलात दाखल होणार आहेत. त्यामुळे नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर पडणार आहे.
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.