www.24taas.com,नवी दिल्ली
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला यांना शिक्षक भरती घोटाळ्यात दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर ओमप्रकाश चौटाला आणि अजय चौटाला यांची थेट तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे.
दिल्लीतील एका न्यायालयाने आपला निकाल देताना माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला याच्यासह ५३ जणांवर शिक्षकांची गैर भरती केल्याचा ठपका ठेवला होता.
चौटाला पिता-पुत्रासह ५३ जणांना बेकायदा शिक्षक भरतीप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. शिक्षकांची करण्यात आलेली भरती ही कायद्याला धरून नाही. त्यामुळे ती बेकायदा आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.
ओमप्रकाश चौटाला हे चार वेळेस हरियाणाचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. हे शिक्षक भरती प्रकरण १९९९-२००० मधील आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं चौटाला यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान शिक्षा सुनावल्यानंतर दिल्लीतील रोहिणी कोर्टाबाहेर ओमप्रकाश चौटाला समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक आणि घोषणाबाजी केली आहे. गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांनी कोर्टाबाहेर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.