हैदराबाद : भोंदू बाबा कधी काय करतील याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही, कारण आंध्रप्रदेशात गुरूवारी एका 'किसिंग बाबा'ला अटक करण्यात आली आहे.
किसिंग बाबाला आंध्र प्रदेशातील कडपा जिल्ह्यातून त्याच्या समर्थकांसह अटक करण्यात आली. किसिंग बाबा त्याच्याकडे महिला उपचारासाठी गेल्यावर, तो त्यांचे चुंबन घेत असे मात्र, पुरुषांना तो लिंबू देऊन त्यांचे निदान करे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या बाबाला अटक केल्यानंतर स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. या न्यायालयाने भोंदू बाबास दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनाविली आहे. तसेच, त्याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचे आढळल्याने न्यायालयाने त्यास मानसोपचार तज्ज्ञांकडेही नेण्यास सांगण्यात आले आहे.
या बाबासोबत सूत्रधार सुब्बा रेड्डी यालाही अटक करण्यात आली आहे. किसिंग बाबा तुमची दुःख दूर करेल तसेच आर्थिक आणि घरगुती समस्यांचेही निराकरण करेल अशी बतावणी करून तो लोकांना बाबांकडे जाण्यास प्रवृत्त करत असे. गेल्या दोन महिन्यासाठी अय्यप्पा मंदिरात या भोंदू बाबाचा कारभार चालू होता.
एका न्यूज चॅनेलने किसिंग बाबा हा महिला भक्तांना चुंबन आणि मिठी मारत असतानाचे व्हिडिओ प्रसारीत केल्यानंतर या किसिंग बाबाला जेरबंद करण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.