देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी

देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय. 

Updated: May 26, 2015, 12:41 PM IST
देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी title=

नवी दिल्ली: देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय. 

उष्माघातानं या दोन राज्यांत मृत्यू पावलेल्यांचा आकडाच तब्बल चारशेच्या पलिकडे आहे. याशिवाय उत्तर भारतातल्या दिल्ली आणि इतर राज्यांतही आग ओकणाऱ्या सूर्याचा तडाखा गेल्या काही दिवसांपासून जाणवतोच आहे. यातून उत्तर भारतात आतापर्यंत अंदाजे दोनशे जण मृत्यू पावले आहेत. उष्माघातानं मृत्यू पावलेल्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही कामगार आणि मजुरांची आहे. 

आतापर्यंत सर्वाधिक अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सियस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. येणारे आणखी काही दिवस भारतभरातलं तापमान चढंच राहणार असल्याची माहिती वेधशाळेनं दिली आहे. त्यामुळे अंगाची काहिली होत असलेल्या या काळात, जास्तीत जास्त पाणी प्या, तसंच भर उन्हात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा, अशाप्रकारच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

जून महिन्यात आगमन होत असलेल्या मान्सूननंतरच, सध्याचं अंग भाजून काढणारं देशातलं तापमान निवळणार आहे. त्यामुळे कोपलेल्या सूर्यनारायणावर उतारा म्हणून, आता सर्वांचंच लक्ष वरुणराजाकडे लागलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.