www.24taas.com, गुडगाव
रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यामधल्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या अशोक खेमका आणि हरियाणा सरकारमध्ये चांगलीच जुंपलीय. ‘मी दिलेले आदेश चुकीचे असतील तर कोर्टात जा’ असं म्हणत अशोक खेमका ठामपणे हरियाणा सरकारसमोर उभे ठाकलेत.
हरियाणा सरकारचे शहर शहर आणि नियोजन विभागाचे जनरल डिरेक्टर टी. सी. गुप्ता यांनी मुख्य अध्यक्षांना एक चिठ्ठी लिहिलीय. यामध्ये त्यांनी अशोक खेमका यांनी उपस्थित केलेले मुद्दे निराधार असल्याचा दावा केलाय. तसेच खेमका यांनी दिलेले आदेशही चुकीचे असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर यावर खेमका यांनी ठामपणे गुप्ता यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. ‘मी दिलेले आदेश चुकीचे असतील तर ते कोर्टात सिद्ध करून दाखवावं, मला हे चांगलंच ठाऊक आहे की, मी जे आदेश दिले होते ते योग्य होते’ असं खेमका यांनी म्हटलंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यामध्ये झालेल्या जमीन व्यवहार रद्दबादल ठरवण्याचे आदेश देणाऱ्या खेमका यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठोस पुरावे तयार करण्याचं काम वेगवेगळ्या पातळ्यांवर जोरात सुरू आहे. टी. सी. गुप्ता यांनी खेमका यांच्या या संदर्भातील चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती बनवण्याची मागणीही पत्राद्वारे केलीय. तसंच खेमका यांचे आदेश चुकीचं असल्याचं आढळलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केलीय. रॉबर्ट वडेरा यांच्याशी संबंधित डीएलएफ घोटाळ्या प्रकरणी कारवाईचे आदेश दिल्यानंतर खेमका यांची बदली करण्यात आली होती.