सोहा अली खाननं मतदानासाठी सोडलं आयफा अॅवॉर्ड्स

अभिनेत्री सोहा अली खानचं म्हणणं आहे तिला 24 एप्रिलला आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यामुळं या महिन्याच्या अखेरीस फ्लोरिडाच्या टेंपा बेमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी म्हणजेच `आयफा` अॅवॉर्ड्स सोहळ्याला तिनं जाण्याचं रद्द केलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 10, 2014, 06:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री सोहा अली खानचं म्हणणं आहे तिला 24 एप्रिलला आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यामुळं या महिन्याच्या अखेरीस फ्लोरिडाच्या टेंपा बेमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी म्हणजेच `आयफा` अॅवॉर्ड्स सोहळ्याला तिनं जाण्याचं रद्द केलंय.
यंदा 23 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान आयफाचं आयोजन करण्यात आलंय आणि मुंबईत लोकसभा निवडणुकीचं मतदानही 24 एप्रिललाच आहे. अनेक सेलिब्रेटी या पुरस्कार सोहळ्यासाठी फ्लोरिडाला जाणार आहेत. यावरून आता वादही निर्माण झालाय की कलाकारांना मतदानापेक्षा पुरस्कार सोहळ्याचं महत्त्व जास्त आहे.
मात्र सोहानं मतदानाची निवड करत 24 एप्रिलला मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतलाय. सोहा म्हणते, एप्रिलमध्ये मला इतर अनेक ठिकाणांहून निमंत्रणं आली आहेत. आयफाचंही आमंत्रण आलं, मात्र मी कुठंही जाणार नाहीय कारण मतदान करणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेटपटू मंसूर अली खान पटोडीची मुलगी सोहानं मतदानाच्या दिवशी देशाबाहेर जाणाऱ्या इतर कलाकारांबद्दल बोलणं मात्र टाळलं.
सोहा म्हणाली, मी दुसऱ्यांबद्दल काही बोलू शकत नाही. पण नक्कीच मी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन करते. अभिनेता ऋतिक रोशन, अनुपम खेर, शाहिद कपूर, विद्या बालन, फरहान अख्तर हे कलाकार आयफामध्ये सहभागी होणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.