www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बदलला गेलाय. आता काँग्रेस २७ तर राष्ट्रवादी काँग्रेस २१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल मागे जात हातकणंगलेची जागा काँग्रेससाठी सोडलीय.
आता राष्ट्रवादी काँग्रेस रायगडमधून उमेदवार देणार आहे. विद्यमान मंत्री सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे हिंगोली, हातकणंगले आणि जालना याठिकाणी काँग्रेसचाच उमेदवार असेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये यापूर्वी २६-२२चा फॉर्म्यूला झाला होता. पण हातकणंगले उमेदवार मिळत नसल्यानं राष्ट्रवादीनं ही जागा काँग्रेससाठी सोडली. तसंच जयंत पाटील यांनी हातकणंगले इथून निवडणूक लढण्यास नकार दिला असल्यानंही ही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी हातकणंगले आणि रायगड लोकसभा जागेची अदलाबदली करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. पंढरपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीच्या मेळाव्यात त्यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादीकडून रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी निश्चित समजण्यात येतेय. तर हातकणंगलेमधून कलप्पा आवाडे यांचं नाव आघाडीवर आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.