www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत मराठी माणसांसाठी बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात आता अमराठी अधिकाऱ्यांची मुजोरी सुरु झालीय. याचा फटका दिल्लीत राहणाऱ्या आणि महाराष्ट्र सदनात कार्यक्रम करु इच्छिणाऱ्या कलावंतानाच सहन करावा लागतोय. महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह कार्यक्रमात याचाच प्रत्यय आलाय.
या कार्यक्रमात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने सतारवादन आणि पडघवली कादंबरी वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आयोजक आर. एम. हेजिब यांनी महाराष्ट्र सदनात ३० हजार रुपये भरले. शिवाय त्यांनी स्टेज, साऊंड सिस्टिमसह इतर सर्व गोष्टींची तयारी केली. मात्र, ऐन कार्यक्रमाच्या वेळी आयोजक हेजिब, वीणा देव यांना सामानाचा ट्रक महाराष्ट्र सदनात नेण्यास मनाई करण्यात आली. यावेळी वीणा देव आणि मराठी रसिकांचा अवमान करण्यात आला. नितीन गायकवाड या अधिकाऱ्यानंही जे सामान असेल त्यात कार्यक्रम करण्यास सांगितले. या संदर्भात महाराष्ट्र सदनचे रेसिडेंट कमिशनर बिपीन मलिक यांना विचारणा केली असता त्यांनीही अरेरावीची भाषा वापरली. साऊंड सिस्टिमबाबत विचारलं असता तुम्ही जागा बदला, असा मग्रुरीचा अनाहूत सल्ला त्यांनी दिला. अखेर खराब साऊंड सिस्टिम आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हा कार्यक्रम पार पडला. मात्र, दीडशे कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात मराठीजनांचा अपमान का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.
या कार्यक्रमासाठी तीन महिने अधीपासूनच पत्रव्यवहार सुरू होता. आवश्यक त्या परवानग्याही मिळाल्या होत्या. मग आयत्यावेळी परवानगी नाकारण्याचं कारण आणि राजकारण काय असा सवाल आता उपस्थित होत आहे. कार्यक्रमाचे आयोजक हेजीब आणि ज्येष्ठ कलाकार वीणा देव यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पाहतायत ना?
नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन ही भव्य वास्तू मराठी जनांसाठी उभारण्यात आलीय. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून दिल्लीतल्या राज्यकर्त्यांच्या छातीत धडकी भरवण्याचं काम मराठीजनांनी केलंय. पेशव्यांनीही दिल्लीचं तख्त फोडण्याचा पराक्रम केलाय. स्वातंत्र्यानंतर आपल्या सुसंस्कृत राजकारणाने यशवंतराव चव्हाण यांनीही आदर्श निर्माण केला. त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रमात दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात अमराठी अधिकाऱ्यांनी मराठी कलाकारांशी तसंच मराठी रसिकांशी मुजोरी केल्याची घटना घडलीय. ‘३०-३० हजार रूपये दिवसाचं भाडं घेतल्यानंतरही चांगली साऊंड सिस्टीम तसंच इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी कोणाची?’ हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
यशवंतराव चव्हाण हय़ात असताना त्यांच्या सुसंस्कृतपणाला दुबळेपणा समजत त्यांचा अपमान दिल्लीकरांनी केला. आता त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ झालेल्या कार्यक्रमातच मराठी जनांचा अपमान हा एकप्रकारे यशवंतरावांचाच अपमान आहे. हा अपमान बाणेदार मराठी मन सहन करणार नाहीच, पण राज्य सरकारनेही हा अपमान सहन करू नये. विशेष म्हणजे स्वतः यशवंतराव चव्हाण हे कराडचेच होते आणि सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही कराडचेच आहेत. मुख्यमंत्री यशवंतरावांचा हा अपमान सहन करणार का? असं प्रश्न आता विचारला जातोय. दिल्लीतले महाराष्ट्र सदनातले हे अधिकारी मुख्यमंत्र्यांच्याच अखत्यारीत येतात. मग अशा मुजोर अधिका-यांना मुसक्या आवळण्याचं काम मुख्यमंत्री करणार का? हाच खरा प्रश्न आहे. या निमित्ताने काही सवाल ‘झी २४ तास’ उपस्थित करत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.