www.24taas.com, मुंबई
देवाची पूजा करताना आपण नेहमी दिवा लावतो. तसंच संध्याकाळीही देवासमोर आणि दारामध्ये दिवा लावला जातो. संध्याकाळला दिवेलागणची वेळ असंही संबोधलं जातं. पुजेमध्ये दिव्याला आणखी महत्व आहे. दिव्याला असं का महत्व दिलं जातं?
याचं कारण म्हणजे दिवा हा ज्ञानाचं आणि तेजाचं प्रतीक आहे. धर्मशास्त्रानुसार पुण्यकाळात धन ऐश्वर्याची देवी लक्ष्मी भ्रमण करत असते. त्यामुळे घरातील कलह, दारिद्र्य, रोग किंवा आर्थिक संकट यांना दूर करण्यासाठी घरात देवाजवळ दिवा लावणं शुभ असतं. प्रकाशामध्ये पावित्र्य असतं, मांगल्य असतं. संध्याकाळची हुरहूर लावणारी वेळ ही नेहमी मनात काहूर माजवत असते. अशावेळी दिवा लावल्यामुळे मन शांत होतं. देवाजवळ दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये श्रीमंती येते.
संध्याकाळी दिव्यासमोर हात जोडून दिव्या दिव्या दिपत्कार असं म्हटलं जातं. याचं कारण दिवा हे लक्ष्मीला घरी बोलावण्याचं आमंत्रण मानलं जातं. घरातली पीडा बाहेर जाऊन बाहेरची लक्ष्मी घरात येते. संध्याकाळी स्वंयपाकघरात पाणी ठेवलं जातं त्याच्याजवळ तेलाचा दिवा लावल्यास घरातील आर्थिक संकटं दूर होतात. दिव्यामुळे घरातील अंधारात वावरणारी नकारात्मक नष्ट होते.