www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं मदतीचा हात पुढे केलाय. त्याच्या ‘बिइंग ह्युमन फाऊंडेशन’द्वारे सलमान मराठवाड्यात 2500 पाण्याच्या टाक्यांचं वाटप करणार आहे. तसा प्रस्ताव त्यानं मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांना पाठवला आहे. त्यात मराठवाड्यात जास्त होरपळत असलेल्या बीड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद या भागातल्या गावांना 2500 टाक्यांचं वाटप करण्यात येणार आहे. येत्या सात तारखेपासून सलमानची ही मदत दुष्काळग्रस्तांना मिळण्यास सुरुवात होईल. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची ही तयारी सलमान खानची सामाजिक बांधिलकीच स्पष्ट करत असल्यांचं मत नागरिकांकडून व्यक्त होतंय.
दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे आता बॉलिवूडचेही लक्ष वळले आहे.. सलमान खान दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील नागरिकांना तब्बल 2500 टाक्यांचे वाटप करणार आहे.. याआधी मकरंद अनासपुरेनही बीड जिल्ह्यातील नागरिकांना 2.5 लाखांची मदत केली होती..तर आशा भोसलेंनी सुद्धा दुष्काळग्रस्तांना 10 लाखांची मदत आधीच दिली आहे..
गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठ्या दुष्काळात सध्या मराठवाडा होरपळून निघतोय.. पाण्यासाठी नागरिकांची दाहीदीशा अशी अवस्था झाली आहे.. त्यात कधी टँकरने पाणी आलेच तर ते भरण्यासाठीही नागरिकांची अडचण होतोय.. सरकारची मदत सुरु आहे मात्र भीषण दुष्काळात ती अपुरी पडतेय. अशातच आता सर्वसामान्य लोकांकडूनही मदत दुष्काळग्रस्तांना सुरु झाली. बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान आता दुष्काळग्रस्तांना 2500 टाक्यांचे वाटप करणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना बीड आणि उस्मानाबाद या दुष्काळ पीडीत गावातील भागांना सलमान खान टाक्यांचे वाटप करणार आहे. तसा प्रस्ताव त्यानं मराठवाड्याच्या विभागीय़ आयुक्तांना पाठवलाय.. बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या मदतीचं नागरिकांनीही स्वागत केलय...
दुष्काळातील नागरिकांना मदतीची गरज आहे. या आधीही औरंगाबादच्या ए टू झेड गुप्रने दुष्काळग्रस्तांना कोट्यवधीची मदत केली होती.. तब्बल 10 पाण्याचे टँकर आणि तलावातील गाळ काढण्यासाठी उद्योजकांच्या या ग्रुपने पोकलेन सुद्धा पुरवले होते... तर मराठी कलाकार, मकरंद अनासपुरेनही बीड जिल्ह्यासाठी 2.5 लाखांची मदत जाहीर केली होती. तर स्वरसम्राज्ञी आशा भोसलेंनी सुद्धा दुष्काळग्रस्तांसाठी त्यांना पुरस्कारात मिळालेली 10 लाख दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिले होते. मदत मोठी असो वा छोटी मात्र बॉलिवूडच्या या कलाकारांनी मदतीसाठी हात पुढे केलाय हे ही दुष्काळपीडितांसाठी कमी नाही...