www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
गेल्या आठवड्यातल्या राहुल गांधी यांच्या दौ-यानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना काय दिलं.. याच उत्तर शोधायला गेलं तर ते आहे रस्त्यांवरचे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात... राहुल गांधी औरंगाबादच्या दौ-यावर येत असल्यानं त्यांच्या दौ-यातल्या रस्त्यांवर खडड्यात काळी माती टाकली गेली. मात्र काल या भागात पाऊस झाला आणि रस्त्याचा चिखल झाला.
गेल्या आठवड्यात राहुल गांधींचा ताफा ज्या रस्त्यावरून धुरळा उडवत गेला होता. मात्र आठवड्यानंतर त्याच रस्त्याची पुन्हा दुरावस्था झाली आहे. एकाच पावसात बाबरा गावातल्या रस्त्याची अशी अवस्था झाली आहे. आठवडाभरापूर्वी राहुल गांधींच्या दौ-यासाठी बाबरा गावातल्या रस्त्यांची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांनी रातोरात कामं केली होती.. रस्त्यांवर माती टाकून रस्ता गुळगुळीत बनवला होता. मात्र राहुल गांधी गेल्यानंतर एका पावसातच रस्ता होत्याचा नव्हता झाला.. रस्त्यावर झालेल्या चिखलामुळं वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागतेय. गेल्या दोन दिवसात खडड्यात पडून काही लोक जखमीही झालेत.
अधिकारी मात्र हे सगळं पालकमंत्री बाऴासाहेब थोरात आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं केल्याचं सांगतात. रस्त्याच्या अवस्थेला कंटाळून गावक-यांनी कार्यकारी अभियंत्यांना कोंडून ठेवून ठिय्या आंदोलन केलं. रस्त्याची किमान डागडुजी करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर गावक-यांनी आंदोलन मागं घेतलं.
राहुल गांधी यांचा कुठलाही शासकीय दौरा नव्हता. अचानक दौरा आल्यानं सरकारी यंत्रणेनी आपली कामं पटापट, जमतील तशी तशी केली. जनावरांसाठी तात्पुरती छावणीही उभारली. विशेष म्हणजे रोहयोच्या कामावरचे मजूरही दुसरीकडून आणले. आता ही सगळी बनावट कामं करून राहुल गांधीच्या दौ-याचं श्रेय सरकारी यंत्रणेनी आणि पक्षाच्या नेत्यांनी घेतलं खरे. मात्र ज्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी आले होते त्यांच्या नशिबी मात्र राहुल गांधीची पाठ फिरल्यानंतर फक्त यातनाच आल्या.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.