www.24taas.com, नांदेड
नांदेडच्या हिमायतनगर काँग्रेस शहराध्यक्षानं एका महिलेची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केलीये. याप्रकरणी तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आलीय तर याप्रकरणी दोन पोलिसांनाही निलंबित करण्यात आलंय.
निर्मलाबाई हणवते असं या मृत महिलेचं नाव आहे. रेशनिंग दुकान भाड्याच्या जागेत चालवण्याच्या वादातून खून झाल्याचं सांगण्यात येतंय. निर्मलाबाईंच्या नावावर हे रेशनिंगचं दुकान होतं. हे दुकान काँग्रेसचा शहराध्यक्ष अब्दुल वाहेद यांच्या मालकीच्या जागेत होते. जागेचा भाडेकरार संपल्यानं निर्मलाबाईंनी स्वःताच्या जागेत दुकान चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, वाहेद यानं त्याला विरोध केला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यातूनच वाहेद यानं निर्मलाबाई यांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केलं.
या प्रकरणी नांदेड पोलिसांनी वाहेदसह इतर नऊ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. घटनेनंतर वाहेदसह सहा आरोपी फरार झालेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाची माहिती घटनेच्या एक दिवस आधीच या महिलेनं पोलिसांना दिली होती तसंच वाहेदच्या विरुद्ध तक्रारही निर्मालाबाईंनी दाखल केली होती. पण, याप्रकरणात फक्त बघ्याची भूमिका घेऊन कोणतीही कारवाई न केल्यामुळे दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.
एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना प्रत्यक्षात घडल्यानं नांदेडवासियांमध्ये मात्र घबराट पसरलीय. या घटनेनंतर हिमायतनगरमध्ये नागरिकांनी बंद पाळला आहे.