चला बाप्पा निघाले.... अहो परदेश वारीला...

महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा...गणपतींचं आगमन होण्यास आणखी तीन महिने अवकाश असला तरी रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये बाप्पांच्या परदेशवारीसाठी लगबग सुरू झाली.

Updated: Jun 26, 2012, 09:49 PM IST

www.24taas.com, ुपेण

 

महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा...गणपतींचं आगमन होण्यास आणखी तीन महिने अवकाश असला तरी रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये बाप्पांच्या परदेशवारीसाठी लगबग सुरू झाली. पेणमधील गणपतींच्या मूर्तींना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह अनेक देशांमधून मोठी मागणी असते. रायगडमधील पेण शहर गणपती बाप्पांचं घर म्हणून ओळखलं जातं.

 

कोरीव आणि रेखीव रंगकामांमुळे पेणच्या मूर्ती जगभरात प्रसिद्ध आहेत. आकर्षक मूर्ती घडवण्याचं काम दरवर्षीप्रमाणे यंदाही पेणमध्ये सुरू आहे. मात्र यंदा विशेष उत्साह आहे तो परदेशातील बाप्प्यांच्या मूर्तींच्या वाढत्या मागणींमुळे. यंदा सहा इंचापासून सहा फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तींना प्रचंड मागणी आहे. काही दिवसांतच बाप्पा परदेश वारीला निघणार असल्यामुळे मूर्तींवर आता शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे.पेणमधील शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह गणेशमूर्ती कारखान्यांवरतीच अवलंबून आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असते.

 

मात्र यंदाही मूर्ती व्यवसायाला महागाईची झळ सोसावी लागतेय. त्यामुळे मूर्तींच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होणारेए. व्यवसायवृद्धी होत असताना पेणमध्ये मात्र प्रकर्षाने लोडशेडिंगची समस्या जाणवतेय. त्यामुळे गणेशमूर्तींच्या माध्यमातून जगभरात आपली कला पोहचविणा-या या कला केंद्रांवर 24 तास वीजपुरवठा व्हावा. अशी मागणी करण्यात येतंय.