'दिल चाहता है' या आपल्या पहिल्या वहिल्या सिनेमात नव्या पिढीची स्पंदने अचुक टिपणाऱ्या फरहान आख्तरच्या डॉनच्या सिक्वलबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. तशातच शाहरुख खानचा या आधी रिलीज झालेल्या रा.वनला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी झोडपून काढल्यानंतर किंग खानचं बीपी वाढलं असल्यास नवल वाटायला नको. पण फरहानच्या उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे डॉनचा सिक्वल 'डॉन 2' एक दर्जेदार निर्मिती असल्याचं मत समीक्षकांनी नोंदवलं आहे.
'डॉन दे चेस बिगीन्स' हा जुन्या जमान्यातील क्लासिकचा रिमेक असल्याचं ओझं फरहानच्या मानगुटीवर होतं पण सिक्वलने ते फेकून दिलं आहे. आणि एवढंच नव्हे, तर पहिल्या भागापेक्षा सिक्वल सरस ठरला आहे. पहिला भाग संपतो तिथेच सिक्वेलची सुरवात होते. पहिल्या भागात डॉन पोलिसांच्या तावडीतून पळतो आणि सिक्वलमध्ये तो थायलंडमध्ये अवतरतो. पण त्यानंतर काही अतर्क्य घटना घडतात आणि तो पोलिसांसमोर शरणागती पत्करतो. डॉनला मलेशियाच्या जेलमध्ये पाठवण्यात येतं तिथे त्याची भेट जुना वैरी वर्धनशी (बोमन इराणी) होते. त्यानंतर जेलमधून पळण्याचं नियोजन करत डॉन आणि वर्धन त्यात यशस्वी होतात. दोघेही बर्लिनमध्ये दाखल होतात आणि तिथे जुन्या आणि काही नव्या साथीदारांसह बँक लुटण्याची ते योजना आखतात.
सिनेमाची कथा संपूर्णत: ओरिजीनल नाही. ती हॉलिवूडच्या ओशन इलेव्हन, मिशन इम्पॉसिबल आणि डाय हार्ड सारख्या थ्रिलर्सवरुन ती उचलण्यात आली आहे. फरहान आख्तर, अमित मेहता आणि अमरीश शाह यांनी लिहिलेल्या कथेत ताजेपणाचा अभाव आहे आणि काही ठिकाणी ती कमकुवतही आहे. पण जिथे कथेत कच्चे दुवे आहेत तिथे ऍक्शन सिक्वेन्सेसने सिनेमा चमकदार ठरतो. सिनेमात काही चित्तथरारक स्टंट आणि पाठलागचे सिक्वेन्सेस आहेत. प्रियांका आणि शाहरुखमधला कारच्या पाठलागचा सिक्वेन्स हा सिनेमाचा परमोच्च बिंदु ठरावा. तसाच शाहरुख गगनचुंबी इमारतीवरून स्वत:ला वाचवण्यासाठी उडी मारतो तो सीनही श्वास रोखून धरायला लावतो. प्रियांका चोप्रा, बोमन इराणी, कुणाल कपूर आणि ओम पुरी अशी तगडी स्टार कास्ट असतानाही शाहरुख सिनेमा खाऊन टाकतो यातच सर्व काही आलं. शाहरुखने डॉनच्या भूमिकेत जान ओतली आहे असंच म्हणावं लागेल. शाहरुखने बाझीगर नंतर बऱ्य़ाच काळानंतर डॉनमधली नकारात्मक भूमिका अत्यंत सहज आणि लिलया साकारली आहे. किंग खान इज बॅक.
[jwplayer mediaid="17398"]
[jwplayer mediaid="17727"]