Saif Ali Khan Attack Case: 'आरोपीची बाजू मीच मांडणार'; कोर्टात दोन वकील भिडले, न्यायाधीश म्हणाले 'तुम्ही दोघं...'

Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीला रविवारी संध्याकाळी वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र यावेळी आरोपीचं वकिलपत्र घेण्यावरुन दोन वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर दंडाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वकिलांना एक टीम म्हणून काम करा असं सांगावं लागलं.   

शिवराज यादव | Updated: Jan 20, 2025, 02:18 PM IST
Saif Ali Khan Attack Case: 'आरोपीची बाजू मीच मांडणार'; कोर्टात दोन वकील भिडले, न्यायाधीश म्हणाले 'तुम्ही दोघं...' title=

Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपी मोहम्मद शरीफुल शहजादला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं असता दोन वकील त्याचं वकीलपत्र घेण्यावरुन आपापसात भिडले. यानंतर दंडाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वकिलांना एक टीम म्हणून काम करा असं सांगावं लागलं. 16 जानेवारीला चोरीच्या उद्देशाने घरात आरोपी मोहम्मद शरीफुल शहजाद याने वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात घुसला होता. यानंतर त्याने सैफ अली खानवर चाकूने वार करत त्याला जखमी केलं होतं. मुंबई पोलिसांनी रविवारी त्याला बेड्या ठोकल्या. 

पोलिसांच्या कडक सुरक्षेत शहजादला वांद्रे येथे मेट्रोपोलिअन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालायने शहजादला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर त्याने नकार दिला. यानंतर त्याला आरोपींच्या बॉक्समध्ये जाऊन उभं राहण्यास सांगण्यात आलं. यानंतर एक वकील आरोपीची बाजू मांडणार असल्याचं सांगत पुढे आला. मात्र त्याने वकीलपत्रावर आरोपीची स्वाक्षरी घेण्याआधीच नाट्यमय घडामोडी घडल्या. 

आणखी एक वकीलाने पुढे धाव घेत वकीलपत्रावर आरोपी शहजादची स्वाक्षरी घेतली. यामुळे नेमकं हल्लेखोर आरोपीची बाजू कोण मांडणार आहे? याबाबत गोंधळ निर्माण झाला. यानंतर न्यायाधीशांनी मध्यस्थी करत दोन्ही वकिलांना आरोपीची बाजू मांडण्यास सांगितलं. 'तुम्ही दोघंही ही केस लढू शकता,' असं सांगत न्यायमूर्तींनी पुन्हा एकदा सर्वाचं लक्ष सुनावणीकडे वळवलं. दोन्ही वकीलही एकत्रित काम करण्यास तयार झाले. सुनावणीनंतर कोर्टाने शहजादला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

आरोपीला अटक करण्यापूर्वी, पोलिसांनी अभिनेत्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे त्याच्यासारखे दिसणाऱ्या अनेक व्यक्तींना अटक केली होती. 16 जानेवारीला पहाटे बांद्रा येथील 'सद्गुरु शरण' इमारतीतील त्याच्या 12 व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये घुसून हल्लेखोराने सैफ अली खानवर वारंवार चाकूने वार केले.

54 वर्षीय अभिनेत्यावर लिलावती रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. लवकरच त्याला डिस्चार्ज मिळू शकेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, शहजाद हा दक्षिण बांगलादेशच्या बारिसल विभागातील झालकाठी जिल्ह्यातील, म्हणजेच झालकाठीचा रहिवासी आहे, तो गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईत होता, त्यादरम्यान तो एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये किरकोळ कामे करत होता.