मुंबई : भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे किंवा आणखी कोणी काहीही म्हणो. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, असा दावा नेते संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत शिवसेनेचे इतर नेतेही हिरीरीने सहभागी झालेत. त्यावेळी राऊत, शिंदे यांनी दावा केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या जन आर्शीर्वाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. बॅक रॅलीनंतर जय हिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यासोबत ते संवाद साधतील. त्यानंतर अंध विद्यालयाला देखील भेट देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते मालेगावकडे जातील. मालेगावमध्ये विजय संकल्प मेळाव्यानंतर ते चांदवडकडे रवाना होतील.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती निश्चित असली आहे. जागावाटप झालेले नाही. जागावाटपाबाबत बैठक होईल. मात्र, आगामी मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असा दावा भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरचिटणीस सरोज पांडे यांनी रविवारी केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेने सरोज पांडे यांना प्रतिउत्तर दिलेय. कोणीही काही म्हणो, शिवसेनेचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे राऊत म्हणालेत.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढाव्यासाठी सरोज पांडे राज्यात आल्या असता भाजपचाच मुख्यमंत्री असेल, असा दावा केला होता. सरोज यांचे जिल्हा दौरे सुरू आहेत. त्याची सुरुवात त्यांनी अहमदनगरमधून केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात भाजपला मिळालेल्या १२२ जागा जिंकूच, मात्र युतीमधील जागांवरही ताकद लावून त्या जिंकून आणू. शिवसेना वगळता इतर घटक पक्षांना दिल्या जाणाऱ्या १८ जागा मात्र त्या पक्षांना कमळ चिन्हावरच लढवाव्या लागतील, असेही पांडे यांनी सूचित आहे.
राज्यात भाजपला चांगले वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे भाजपला राज्यात अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. अन्य राजकीय पक्षांना भवितव्य न राहिल्याने अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.